उमरा सर्कल मध्ये अनेक ग्रामपंचायतींना जागतिक महिला दिनाचा विसर

बालासाहेब शिंदे
मारतळा :- एकीकडे जागतिक पातळीवर महिला दिन साजरा होत असतांना उमरा सर्कलमध्ये महिला दिनानिमित्त ‘विशेष ग्रामसभा’ घेण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी उदासीनता दाखवत जिल्हा परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. विशेषतः महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींनीही विशेष ग्रामसभा घेतली नाही.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना उमरा सर्कलमधील ग्रामपंचायतीना मात्र 8 मार्च जागतिक महिला दिनाचाच विसर पडला आहे. ग्रामपंचायतींना महिला दिनाचा विसर पडू नये यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महिलांसाठी ‘विशेष ग्राम सभा’ आयोजित करून महिलांचा सत्कार सन्मान करावा, पीडित महिलांच्या समस्यांचे निराकरण करावे, स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे, गावपातळीवर महिलांना सन्मानाने वाढविणे महत्वाचे आहे.
समाज म्हणून ही भावना जनसामान्यांच्या मनात रुजवणेही गरजेचे आहे, त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि. 8 मार्च रोजी ‘विशेष ग्राम सभा’ घ्यावी व त्यामध्ये बालविवाह रोखणे, पतीच्या निधनानंतर रुढी व अंधश्रध्देमुळे महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्या असे सुचविले होते पण अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा तर दूरच महिला दिनानिमित्त साधा महिलांचा सन्मानही केला नाही.
विशेष म्हणजे या ग्राम सभेचे छायाचित्रीकरण करण्याच्या सूचना देखिल देण्यात आल्या होत्या परंतु जिल्हा परिषदेच्या सुचनेला एकाही ग्रामपंचायतने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उप मुख्य कार्यकारी सौ.कापसे यांनी लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.