कुंडलवाडी व परिसरातील समस्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून तीन नागरिकांकडून माचनूर रोडवर आमरण उपोषणास सुरुवात

कुंडलवाडी प्रतिनिधी :- कुंडलवाडी शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत प्रश्नासह अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कुंडलवाडी शहरातील माचनूर रोड येथे दि.१५ ऑगस्ट रोजी नागरिकांकडून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
कुंडलवाडी ते माचनूर या मुख्य रस्त्यावरील नदीच्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, कुंडलवाडी ते माचनूर रोडवरील समशानभूमी जवळील पुलाचे बांधकाम नसल्याने पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कुंडलवाडी ते हुनगुंदा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, डौर येथील तलावातील पाणी जवळील शेतामध्ये जाऊन पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे, कुंडलवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर पिंपळगाव चौरस्ता येथे असलेल्या लालकुंठा तलाव फुटल्याने हज्जापूर व परिसरातील गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सदरील तलावाची दुरुस्ती करण्यात यावी व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
कुंडलवाडी परिसरातील नागरिकांना रोजगार व उद्योगधंदे उपलब्ध व्हावे यासाठी मिनी एमआयडीसी उभारण्यात यावी, गुजरी-कौठा येथील मंजूर झालेले ३३ के.व्हि.सबस्टेशन साठी भूसंपादन करून लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे, शहर व परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ सोलार पंप म्हणून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार ते मुख्यमंत्र्यापर्यंत देऊनही शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कुंडलवाडी शहरा पासून माचनूर गावाकडे जाणाऱ्या रोडवर, कोटग्याळचे माजी सरपंच शंकर शामंते, माजी उपसरपंच राजेश मनुरे व गंगाधर गट्टुवार या तीन नागरिकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
या आमरण उपोषणास शहरातील सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दत्तुसेठ -याकावार, शहर विकास कृती समितीचे डॉ.प्रशांत सब्बनवार आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी आमरण उपोषण स्थळी बंदोबस्त ठेवला आहे.