आ.राजेश पवारांच्या विरोधातील नाराजी २०२४ मध्ये चमत्कार घडवणार ?
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : वसंतराव चव्हाण १६ वर्षे आमदार राहिल्यानंतर मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि राजेश पवार आमदार झाले. पण आजपर्यंत त्यांना भाजपमधील जुन्या लोकांशी जुळवून घेता आले नाही तर दुसरीकडे त्यांची जनतेशीही नाळ जुळली नाही. खा.चिखलीकर व विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांचे सोबतचे सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आमदाराच्या एक कलमी कार्यक्रमामुळे भाजपांतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु आहे. सुरु असलेल्या धुसफूसीचा स्फोट झाल्यास २०२४ मध्ये मोठा चमत्कार घडू शकतो.
विद्यमान आमदार राजेश पवार हे २०१४ च्या पराभवानंतर २०१९ च्या मोदी लाटेत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांनी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी तर सोडाच एकाही कार्यकर्त्याशी जुळवून घेतले नाही. ते स्वतः व त्यांची पत्नी एवढेच सिमित कार्यक्षेत्र झाले. त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याशीही त्याचे कधीच जुळले नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यात भाजपमध्ये प्रचंड गटबाजी वाढली. भाजपचे जुने निष्ठावंत बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पा.होटाळकर यांना विविध समित्यावर नियुक्त्या मिळू दिल्या नाहीत उलट पक्ष बांधणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
आ.राजेश पवार हे मतदारसंघातील निष्ठावंत आणि जुन्या जाणत्यांना सोडून महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पत्नीची वर्णी लावून घेतली. नायगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. उमरी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीवरही पुनम पवार यांचीच नियुक्ती करण्यात आली. आमदार म्हणून काम करताना तालुक्यातील किंवा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक असताना पत्नीलाच विविध पदावर बसवून निष्ठावंत आणि जुन्या पदाधिकाऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न करत असल्याने आ.पवार यांच्या या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
नायगाव तालुक्यात खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर नातेवाईकांचेही जाळे आहे. राम पाटील रातोळीकर हे रातोळी येथीलच असल्याने त्यांचेही तालुक्यात चांगलेच प्राबल्य आहे. त्याचबरोबर बालाजी बच्चेवार हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहीलेले आहेत यांचा नायगाव व बरबडा भागात चांगला जनसंपर्क राहीलेला आहे. शिवराज पाटील होटाळकर हे तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहीलेले आहेत. श्रावण पाटील भिलवंडे हे पंचायत समितीचे सभापती होते त्यामुळे वरील सर्व जुन्या जाणत्यांच्या शब्दाला नायगाव तालुक्यात किमत आहे.
खासदारासह, आमदार व बच्चेवार, होटाळकर आणि भिलवंडे यांच्यासह असंख्य निष्ठावंत नायगाव तालुक्यात राजकीय वजन बाळगून आहेत. त्यामुळे यांच्याबाबतचे सुडाचे राजकारण परवडणारे नाही. तालुक्यातील सर्व नाराज गट एकत्र येवून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.पवार यांच्या विरोधात उघड उघड मैदानात उतरल्यास यांना आणखी काही पदाधिकाऱ्यांची साथ मिळू शकते एकंदरीत या नाराजीचा स्फोट झाल्यास २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडू शकतो.
आ.राजेश पवार नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा दावा करतात. पण टक्केवारीमुळे एकही काम दर्जेदार होत नसल्याने अल्पावधीतच दुरावस्था होत आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भुखंडाचे प्रकरण उच्च न्यायालयात घेवून गेल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.