गावाकडच्या बातम्यानायगांवराजकारण

भाजपला मताधिक्य देणारा नायगाव मतदारसंघ काँग्रेसकडे झुकला

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव विधानसभा मतदारसंघ २०१९ ला लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळाले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळाल्याने मतदारांनी आपला मुड बदलला असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण आणि अगोदर ईडीची नोटीस नंतर पक्ष प्रवेश देवून पवित्र करुन घेण्याच्या प्रकाराचा मतदारांना विट आला होता. त्यातच संविधान बदलण्यातून निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण बदलता आले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पासूनच राज्यात महायुतीच्या विरोधात जनमत दिसू लागले होते. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रकडे लक्ष केंद्रित करुन प्रचाराचा धुरळा उडवला पण मतदारांच्या मतावर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे मताधिक्य भाजपला मिळाले यावेळी मात्र काँग्रेस फायद्यात राहीली.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर हे २०१९ च्या निवडणुकीत एकदुसऱ्याच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. यात ४० हजाराच्या मताधिक्याने अशोकराव पराभूत झाले होते. त्यांना पराभूत करण्यात नायगाव विधानसभा मतदारसंघाचाही हातभार होता. चिखलीकरांना २० हजाराचे मताधिक्य नायगाव मतदारसघातून मिळाले होते. या मताधिक्याने नायगाव मतदारसंघात बदलाचे वारे वाहत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश पवार हे तब्बल ५५ हजाराचे मताधिक्य घेवून आमदार वसंतराव चव्हाण यांना पराभूत केले होते.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण भाजपवासी झाल्याने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र माजी आमदार वसंतराव चव्हाण काँग्रेसला बळ देण्यासाठी खंबीरपणे उभे राहीले. काँग्रेसने अशोकराव चव्हाण यांना अनेक पदे दिली, मुख्यमंत्री पदाची संधी दिली खासदारही केले आणि जेव्हा पक्षाला गरज असताना साथ सोडण्याचा घेतलेला निर्णय मतदारांना रुचला नाही. याचा विपरीत परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला विशेषतः नायगाव विधानसभा मतदारसंघातही भाजप प्रवेशाचे पडसाद उमटले. मतदारांनी वसंतराव चव्हाणांना भरभरून मतदार केले.

मतदारांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत दिलेले मताधिक्य २०२४ च्या निवडणुकीत घटले असून चिखलीकरांना ८५४९१ तर वसंतराव यांना ८९८७३ मते मिळाली आहेत. यात ४३८२ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपची जादू ओसरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मागच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य यावेळी घटल्याने मतदारांनी आपला मुड बदलल्याचे दिसतच आहे पण भाजपला मताधिक्य देणारा मतदारसंघ काँग्रेसकडे झुकला आहे.

भाजप आ.राजेश पवार हे २०१९ मध्ये ५५ हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. पण ते यावेळी लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना ५५ हजाराचे तर सोडाच ५ हजाराचेही मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची पक्ष पातळीवर दखल घेतल्या जाणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker