कुंडलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत ४० ठिकाणी दुर्गा देवींची स्थापना
कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या ४० ठिकाणी दुर्गा देवींची स्थापना ३ आँक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात वाजतगाजत मिरवणुका काढून करण्यात आली. शहरी भागात ३३ व ग्रामीण भागात ७ ठिकाणी दुर्गा देवींची स्थापना करण्यात आली आहे.
जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना दि.३ आँक्टोबर रोजी कुंडलवाडी शहर व परिसरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली. भाविकांनी दुर्गा देवींची मूर्ती ढोलताशांच्या गजरात नेऊन स्थापना केली.कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या भक्तीभावाने दुर्गोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सार्वजनिक दुर्गा उत्सवात गरबा, दांडीया, नृत्य व विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र उत्सव समितीकडून महाप्रसादाचे कार्यक्रमही नऊ दिवस आयोजित केले जातात. कुंडलवाडी शहरात ३३ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली तर ग्रामीण भागात हुनगुंदा येथे दोन ठिकाणी संगम,माचनूर,अर्जापूर, हज्जापूर,पिंपळगाव (कुं) या सात ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे.
सण-उत्सवाच्या काळात शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, सामूहिक एकता, बंधुता कायम राहून सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून गावागावात शांततेचे वातावरण राहावे याकरिता कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व कुंडलवाडी पोलिसांनी नवरात्र उत्सव समिती,पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.