देगलूरच्या मुख्याधिकाऱ्यांना कुंडलवाडीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषदेस गत दीड वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसून इतर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कुंडलवाडी नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात येत आहे. यातच दि.१० ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढून कुंडलवाडी येथील मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देगलूर येथील मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेश दिले.
धर्माबाद चे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांची बिलोली येथे बदली झाली तरी त्यांच्याकडे कुंडलवाडी येथील अतिरिक्त पदाचा पदभार ठेवायला पाहिजे होता.कुंडलवाडी ते देगलूर ४२ किलोमीटर अंतर असलेल्या देगलूर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना कुंडलवाडी येथील मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यामागे काय गौड बंगाल आहे अशी चर्चा शहरात होत आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची ३१ मे २०२३ रोजी बदली झाल्यानंतर कुंडलवाडी नगर परिषदेत गत १४ महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही यातच शासनाने गत तीन महिन्यापूर्वी ८० मुख्याधिकाऱ्यांच्या आदेश काढले पण कुंडलवाडी नगरपालिकेसाठी मुख्याधिकारी देण्यास मात्र शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून आले.
वर्षभर बिलोली तहसील मधील तत्कालीन नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. त्यानंतर ४ जुलै २०२४ रोजी चौहान यांच्याकडून पदभार काढून धर्माबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांना देण्यात आला होता.गत तीन महिन्यांपासून कुंडलवाडी नगरपालिकेत सतीश पुदाके यांनी अतिरिक्त पदभार असतानाही चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला. यातच १० ऑक्टोबर रोजी सतीश पुदाके यांची धर्माबाद येथून बिलोली नगरपालिकेत बदली करण्यात आली.
या बदलीनंतर कुंडलवाडी नगरपालिकेचा अतिरिक्तही पदभार काढून देगलूर येथील मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी १० ऑक्टोबर रोजी आदेश काढून दिले आहेत.सतिश पुदाके यांची धर्माबाद येथून बिलोली येथे बदली झाली झाली तरी बिलोली ते कुंडलवाडी अंतर ७ किलोमीटर असताना सतीश पुदाके यांच्याकडेच कुंडलवाडी नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार न ठेवता जिल्हा प्रशासनाने कुंडलवाडी ते देगलूर ४२ किलोमीटर असताना देगलूरच्या मुख्याधिकाऱ्यांना कुंडलवाडी चा अतिरिक्त पदभार देऊन काय साध्य करायचे आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
४२ किलोमीटर अंतरावरून देगलूर चे मुख्याधिकारी कुंडलवाडीच्या नगरपालिकेचा कारभार सांभाळून शहरातील समस्या सोडवतील का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णया चा पुनर्विचार करून बिलोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्याकडेच कुंडलवाडी येथील नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांतून जोर धरीत आहे.