भाजपा लिंगायत समाजात द्वेष पसरवते – निळकंठ ताकबीडकर
नायगाव :- लिंगायत समाजाच्या प्रश्नाला घेऊन लिंगायत संघर्ष यात्रा भक्तिस्थळ अहमदपूर ते शक्तीस्थळ मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण व वैचारिक नेतृत्व निळकंठ ताकबीडकर यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांशी संवाद बैठका घेत पुढे जात आहे.संघर्ष यात्रेचे नरसी येथे आगमन झाले.यावेळी मोठ्या उत्साहात समाज बांधवांनी स्वागत केले व नियोजित सभा संपन्न झाली.
लिंगायत संघर्ष यात्रेच्या नरसी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करदादा भिलवंडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. उद्धव बांगर, प्रा.सोनटक्के, श्यामराव चोंडे, माधव कोरे, विरभद्र चिद्रे, विक्रम पटणे उपस्थित होते.
यावेळी ताकबीडकर बोलताना म्हणाले मागचे दहा वर्षांपासून लिंगायत समाजात प्रलंबित असणाऱ्या प्रश्नाला आजतागायत न्याय दिला नाही. समाजाची अस्मिता असणाऱ्या महात्मा बसवण्णाचे स्मारक मागचे दहा वर्षापासून पूर्ण केले नाही याउलट मंगळवेढा येथे जाऊन त्या पवित्र भूमीचा अपमान करतात यांचा निषेधही केला. लिंगायत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी बार्टी प्रमाणे संस्था स्थापन करण्यात यावी, लिंगायत आरक्षणाचे शुद्धीपत्रक काढण्यात यावे ,स्मशानभूमीचे गाव तिथे निर्माण व्हावे हे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचे असताना मात्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष भलताच गोधळ समाजात निर्माण करत आहे.
यातून समाजात मोठ्या प्रमाणात सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल रोष निर्माण झाला आहे. तात्काळ या सामाजिक अस्मितेच्या मागण्या निकाली काढण्यात याव्यात यासाठीच लिंगायत संघर्ष यात्रा काढल्याची भूमिका यावेळी मांडली. बैठकीसाठी मुगाव, कुंचेली, देगाव, नायगाव, नरसी, ताकबीड, धुप्पा, टाकळी, बेंद्री, लालवंडी येथील समाज बांधव उपस्थित होते.