लोकसभा पोटनिवडणूक…काँग्रेसचे ठरले भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ
प्रकाश महिपाळे
नायगाव : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत काँग्रेसने दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करुन आघाडी घेतली. दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ संपत नसल्याने दररोज नवीन नावाची चर्चा होत आहे. भाजप 20 आक्टोबर नंतरच अधिकृत उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस भाजपमध्येच सामना होणार आहे.
विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसकडून दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. निवडणूका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर दिल्लीत पक्षीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले होते आणि गुरुवारी दि.17 आक्टोबर रोजी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी खा. के.सी. वेणूगोपाल यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रा. रवींद्र चव्हाण हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले.
चव्हाण परिवाराच्या पाठीशी मी व काँग्रेस पक्ष असल्याचे खा. राहूल गांधी यांनी अश्वस्त केल्यानंतर चव्हाण परिवार सक्रीय झाला आणि प्रा. रवींद्र चव्हाणही जिल्हाभरात दौरे सुरु केले होते. निवडणुकीची घोषणा झाल्याच्ई 24 तासातच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी भाजपच्या गोटात उमेदवारीवरुन सुप्त युध्द सुरु आहे. जे नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांना वेटींगवर ठेवून जे नेते लोकसभेची पोट निवडणूक लढण्यास तयार नाहीत ते मैदानात उतरावेत असा प्रयत्न वरिष्ठ नेते करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ सुरु आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी खा. प्रतापराव चिखलीकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, उमरीचे उद्योजक मारोतराव कवळे, राजेश कुंटूरकर यांच्या नावाची चर्चा होत आहे.
प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये मंथन सुरु असून. भाजपला पराभवाचा बदला घ्यायचा आहे तर काँग्रेसला पुन्हा एकदा विजय मिळवायचा आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्ष रणनीती ठरवत असल्याचे दिसून येत आहे पण भाजप मात्र 20 आक्टोबर किंवा नंतर आपला अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांनी शिवधनुष्य उचलून बाजी मारली त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का होता. त्या पार्श्वभूमीवर भाजमध्येच उमेदवाराची चाचपणी सुरु असून विजय मिळवणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे.