कुंडलवाडी शहरातील भुसार दुकानात चोरीला गेले ३ लाख, पोलिसांनी नोंद केली ३ हजार
◆ पोलिसांनी दबाव टाकून फिर्याद घेतली व्यापाऱ्याचा आरोप ◆ फिर्यादीच्या जबाबानुसारच नोंद केली सहायक पोलीस निरीक्षकाची प्रतिक्रिया...
कुंडलवाडी :- शहरातील मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेले मैनोद्दीन मगदूम साब शेख यांचे भुसार दुकानावरील पत्रे वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्यातील रोख रक्कम लंपास करून महत्त्वाची कागदपत्रे, भुसार मालाचे मोठे नुकसान केल्याची घटना दि.१९ ऑक्टोबर च्या मध्यरात्री घडली आहे.
भुसार दुकानाचे मालक मैनोद्दीन शेख हे दुकान उघडण्यासाठी आले असता दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. दुकान मालक चोरीची तक्रार देण्यास गेले असता ३ लाख चोरीची तक्रार घेण्याऐवजी कुंडलवाडी पोलिसांकडून दबाव आणून ३ हजार रुपये चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. असा आरोप व्यापारी मैनोद्दीन शेख यांनी केला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर गत ४० वर्षापासून मैनोद्दीन मगदूम साब यांचे भुसार दुकान आहे.दररोजचे व्यवहार करून शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घराकडे गेले.दि.१९ ऑक्टोबर रोजी ग्रामीण बँकेतून नगदी तीन लाख रुपये आणून भुसार दुकानातील गल्ल्यांमध्ये ठेवून गेले होते.
तसेच दुकानात महत्त्वाची कागदपत्रे व सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी आदी भुसार माल होता. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे वरचे पत्रे वाकून दुकानात प्रवेश करून दुकानात गल्ल्यात ठेवलेले ३ लाख रुपये, महत्त्वाची कागदपत्रे तसेच सोयाबीन मूग उडीद,ज्वारी आदी भुसार मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच दुकानातील खुर्च्यांचीही तोडफोड चोरट्यांनी केली आहे.
घटनेची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना मिळताच त्यांनी दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घटनास्थळी भेट देत पाहणी केली.याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात मैनोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील भुसार दुकान फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील दुकान फोडल्याने व्यापा-यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
◆सदरील चोरी प्रकरणात कुंडलवाडी पोलिसांकडून चोरी झाल्यानंतर तब्बल बारा तासानंतर रात्री ७ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. भुसार दुकानात अडीच ते तीन लाख रुपयांची चोरी झाली असताना कुंडलवाडी पोलिसांकडून माझ्यावर दबाव टाकून दोन ते तीन हजार रुपये चोरी झाल्याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असे बाजार समितीचे माजी संचालक व भुसार दुकानचे मालक मैनोद्दीन शेख यांनी सांगितले.
◆ याप्रकरणी फिर्यादी मैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारच जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया कुंडलवाडी पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दिली आहे.