शिवसेना शिंदे गटाच्या पहील्या यादीत आ.बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी जाहीर
प्रकाश महिपाळे
नांदेड : विधानसभेच्या 45 उमेदवाराची पहीली यादी शिवसेनेने (शिंदे गट) जाहीर केली आहे. यात नांदेड दक्षिण मधून बालाजी कल्याणकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेना फुटीनंतर आ. कल्याणकर शिंदे गटासोबत गेले होते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीत आ. बालाजी कल्याणकर यांचे नाव 14 व्या क्रमाकावर नाव आहे. महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता लागली आहे.
भाजपने यापुर्वी 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचा संदेश महाराष्ट्रात गेल्यानंतर 45 उमेदवारांची पहीली यादी शिंदे गटाने जाहीर केली. यादीत पहील्या क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असून काय झाडी काय डोंगर या डायलॉगने राज्यात प्रसिद्ध झालेले आणि पाच कोटीची रक्कम सापडल्याच्या प्रकरणात संशय असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू यांच्या नावाचाही समावेश आहे. एकंदरीत शिंदे गटाच्या शिशसेनेची यादी पाहीली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या विद्यमान आमदारावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या अनेक समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला पण नांदी उत्तर मधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश केला नसून यात माजी पालकमंत्री डि.पी. सावंत याचाही समावेश आहे. नांदेड उतरची जागा शिवसेना (उबाठा)गटाची असल्याने या जागेवर ठाकरे गटाचे पदाधिकारी दावा करत आहेत. तर दुसरीकडे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा व नांदेड उत्तर च्या बदल्यात हदगाव किंवा बिलोलीचा पर्याय ठाकरे गटाला देण्यात आल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देते याची उत्सुकता लागली आहे.
महायुती मधील भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र महायुतीतील सहयोग पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि शिवसेनेने (शिंदे गट) यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील हे उमेदवार असणार आहेत तर नांदेड उत्तर सभा मतदार संघातून बालाजी कल्याणकर हे उमेदवार असणार आहेत. कल्याणकर यांनी पक्ष फुटीच्या वेळी सुरत मार्गे गुहाटी येथे गेले होते.