वंचित कडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या लिंगायत चेहऱ्याने वाढवले भाजपचे टेंशन
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : आ.राजेश पवारांच्या हेकेखोर कार्यशैलीचा फटका बसल्यानंतर शासकीय नौकरीचा राजीनामा दिलेले उमरी येथील लिंगायत समाजाचे डॉ.माधव विभुते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर नायगाव मतदार संघाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. विभुते यांनी काल सोमवारी मोठे शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदार संघातील लिंगायत समाज त्यांच्या मागे एकवटत चालला असल्याचे दिसून येत आहे.
नायगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी मागच्या पाच वर्षात अतिशय मनमानी कारभार केला. किरकोळ कारणासाठी अधिकाऱ्यांना वेठीस धरणे, त्यांच्या विरोधात तक्रारी करणे, ना हरकत प्रमाणपत्र न देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार करणे अदिसह अनेक उचापती केल्या.
त्याचबरोबर उमरीचे डॉ माधव विभुते यांच्याशीही त्यांचे खटके उडाले त्यामुळे हा वाद बराच वाढला शेवटी डॉ.माधव विभुते यांनी दि.25 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या शासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि त्याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी आपला जीवन परिचय देण्याबरोबरच आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत सहकार्य दिलेल्यांचे आभार मानले असले तरी नौकरीचा राजिनामा दिल्यानंतरच्या भावना मनात दाटलेल्या दिसून आल्या.
राजीनामा दिल्यानंतर डॉ. माधव विभुते यांनी आ. राजेश पवारांच्या विरोधात उघड उघड भुमिका घेण्यास सुरुवात तर केलीच पण लिंगायत समाजालाही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना बरेच यशही मिळाले आणि एका प्रकरणात लिंगायत समाजाने धर्माबाद शहरात काढलेला भव्यदिव्य मोर्चा बरेच काही सांगून गेला. मोर्चा भव्यदिव्य होण्यासाठी डॉ.विभुते यांचा अद्रश्य हात होता असेही बोलल्या जाते.
विधासभेचे पडघम वाजताच त्यांनी उमेदवारीसाठी काही राजकीय पक्षांची चाचपणी केली व अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली. विशेषतः विभुते हे लिंगायत समाजाचे असून लिंगायत समाज हा आजपर्यंत भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभ असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत लिंगायत समाजाने आ.राजेश पवार यांना भरभरून मते दिली होती तरीही त्यांनी लिंगायत समाजाच्या डॉक्टरला त्रास दिल्याचा राग वाढत चालला आहे. सर्वच पक्ष जातीय समीकरण लक्षात घेऊनच उमेदवारी देत आहेत. जातीय समीकरणाची जुळवा-जुळव करून विजयाची गणित मांडली जात आहेत. मात्र डॉ.विभुते यांच्याशी असलेले वैर वाढत गेल्याने आ.पवार यांना सोप्पी वाटणारी निवडणुक अवघड होत चालली आहे.
डॉ.विभुते यांनी काल दि. 28 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी नायगाव शहरातील अंबिका मंगल कार्यालयात जाहीर सभाही घेतली. सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय पाहता डॉ. माधव विभुते हा लिंगायत चेहरा भाजपचे टेंशन वाढवणारा असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकातून येत आहेत.