बौध्द समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे – सिध्दार्थ हत्तीअंबीरे
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : देशाचे संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे राहूल गांधी यांनी रस्त्यावरची लढाई लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना बौध्द बांधवांनी प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील जयराज मंगल कार्यालयात तालुक्यातील बौद्ध समाजाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेला नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ. मिनल खतगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण, डॉ. मिनाक्षी कागडे, प्रफुल दादा, सुरेश हटकर, महानंदा गायकवाड, सय्यद ईसाक नरसीकर, रेखा देवकर, प्रकाश हनमंते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना हत्तीअंबीरे म्हणाले की, देशातील जातीयवादी पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत आहेत पण काँग्रेसचे राहूल गांधी व मल्लिकार्जुन खरगे हे संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यामुळे बौध्द समाजाने आपली ताकत काँग्रेसच्या पाठी उभी करावी. बाबासाहेबांना आर एस एस च्या व भाजपच्या विरोधात लढा द्यावा लागला त्यामुळे ही लढाई बाबासाहेबांच्या विचारांची व मनुस्मृती विरोधातील आहे त्यामुळे जातीयवादी पक्षाच्या उमेदवाराला थारा देवू नका.
देशात संविधान टिकवायच असेल तर लोकसभेला रवाना चव्हाण व विधानसभेसाठी डॉ. मिनल खतगावकर यांना प्रचंड मताधिक्य देणे आवश्यक आहे. आपली लढाई पन्नास खोके आणि एकमदम ओके म्हणजेच धनदांडग्याच्या विरोधातील आहे. या सरकारने मागच्या दोन वर्षात महात्मा फुले महामंडळाला एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्याचबरोबर गोरगरीब महिलांचे व निराधारांचे अनुदानही थांबवले आहे.
त्यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारला जागा दाखवायची असेल तर येत्या २० तारखेला लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रा. रवींद्र चव्हाण व विधानसभेसाठी डॉ. मिनल खतगावकर यांना मतदान करुन प्रचंड मताधिक्याने विजयी करि असे आवाहन हत्तीअंबीरे यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश हनमंते यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. शिवाजी कागडे यांनी केले.