आ.राजेश पवारांच्या छप्परफाड विजयाने मतदार संघात जल्लोष

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आ.राजेश पवार यांच्या विजयाचा जल्लोष नायगावमध्ये करण्यात येत असून. आ.पवार यांनी घडवलेली काशी विश्वनाथ यात्रा, लाडकी बहीण योजना व जरांगे समर्थकांनी दिलेल्या भरभरून मतदानामुळे छप्परफाड विजय मिळाला आहे. राजेश पवार यांना १ लाख २९ हजार मते मिळाली तर डॉ.मिनल खतगावकर यांना ८१ हजार मते मिळाली.

नायगाव विधानसभा मतदार संघात तिरंगी सामना झाला. यात महायुतीचे आ.राजेश पवार हे भाजपकडून, महाविकी आघाडीकडून डॉ.मिनल खतगावकर काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती तर वंचित बहूजन आघाडीकडून डॉ.माधव विभूते हे निवडणुकीच्या मैदानात होते. तीनही उमेदवारांनी प्रचाराचा अनेक मुद्दे उपस्थित केले. विकास कामातील टक्केवारी, त्याचबरोबर गोदावरी मनार सारखा कारखाना मोडीत काढला तसेच डॉ.मिनल खतगावकर या बाहेरच्या असल्याचाही आरोप झाला. तिन्ही उमेदवारांनी एकदुसऱ्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
मागच्या पंधरा दिवसांत उडालेल्या प्रचाराच्या धुरळ्यामुळे नायगाव विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती आणि काटे की टक्कर होणार असे वाटत असतानाच मतदार संघात निर्माण झालेली चुरस ही फोल ठरल्याचे दिसून येत आहे. आ.राजेश पवार यांनी मागच्या पाच वर्षात मतदार संघातील रस्ते सुधारणा करण्याच्या कामावर भर दिली होती. मतदार संघातील प्रमुख रस्ते करण्यावर त्यांनी भर दिला.
त्याचबरोबर त्यांनी गावोगावी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीरे घेतली, रुग्णांना चश्मे घरपोच दिले. मागच्या दोन वर्षापासून त्यांनी तिर्थयात्रा सुरु केली होती. त्यात त्यांची काशी यात्रा लक्षवेधी ठरली मतदार संघातील हजारो नागरिकांनी काशी यात्रेत विश्वनाथाचे दर्शन घेतले आणि काशीला गेलेले मतदार हे प्रामाणिक असतात अशी चर्चा होत होती.
आ.राजेश पवार व त्यांच्या पत्नी सौ.पुनम पवार यांनी सतत मतदार संघात संपर्क ठेवून मतदारांच्या अडचणी समजून तर घेत होत्याच पण आरोग्य शिबिरात आयोजित करुन गोरगरीब नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत होत्या या कामाचा तर आ.राजेश पवार यांना फायदा तर झालाच पण मराठा समाजातील तरुणही आ.पवार यांच्या संपर्कात होते त्यामुळे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरुन रान उठवले असले तरी मतदार संघातील मराठा समाज मात्र भाजपला भरभरून मते देतांना दिसला. विशेषतः राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे महिलांनीही भाजपच्या पारड्यात आपले वजन टाकले.
झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेणाऱ्या राजेश पवार यांची शेवटच्या राउंडपर्यंत आघाडी कायम होती. त्यामुळे आ.राजेश पवार हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात येत असून ढोल ताशे, फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येत आहे.