गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक गावच्या ग्रामसेवकांचा कारभार तालुक्यावरुनच…
मोरे मनोहर
किनाळा :- सामान्य जनतेचे लहान मोठे असणारे प्रश्न वेळेवर सुटावे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाने विविध शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना मुख्यालयास राहण्याचे आदेश देण्यात आले परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत बिलोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनेक गावातील ग्रामसेवकांचा कारभार तालुक्यावरूनच चालत असल्याने गावातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली जात असून याकडे वरीष्ठ अधिकाऱ्याने तात्काळ लक्ष देऊन मुख्यालयास न राहणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावे अशी मागणी सामान्य जनतेतुन केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की सरकारी कर्मचारी मुख्यालयात राहून वेळेवर जनतेच्या समस्या सोडवाव्यात यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी सांगितले जात आहे परंतु बिलोली येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघासह रामतीर्थ, हिप्परगामाळ, कुंचेली, टाकळी, शेळगाव गौरी, बिजुर, बोरगाव, चिटमोगरा, कामरसपल्ली, केरुर यापैकी अनेक गावांतील ग्रामसेवकांचा कारभार हा गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुख्यालयात हजर न राहता तालुका व जिल्हा स्तरावरून चालत असल्याने गावातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामसेवकांची देवाप्रमाणे वाट पहावी लागत आहे.
तालुकास्तरीय विविध कार्यालयाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम होत असून परिणामी सर्वसामान्यांची कामे निर्धारित वेळेत होताना दिसत नाहीत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या “अपडाऊन”प्रकाराकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.