चोवीस लाखाच्या अपहार प्रकरणात मांजरमच्या तत्कालीन महिला सरपंच, एक वादग्रस्त ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याच्या विरोधात गुन्हा नोंद
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मांजरमचे तत्कालीन सरपंच स्वाती सुरेश योगेकर, ग्रामसेवक सुधाकर वडजे व पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता एम.ए. जीरवणकर यांनी संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत २४ लाख ५० हजार ७३४ रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार वरील तिंघाच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जीरवणकर व वडजे हे रातोळीच्या प्रकरणातून सुटले होते पण मांजरमच्या भ्रष्टाचारात अडकले आहेत.
मांजरम, नायगाव, येथील तत्कालीन सरपंच सौ. स्वाती सुरेश योगेकर, ग्रामसेवक सुधाकर वडजे व नायगाव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता एम.ए. जीरवणकर यांनी सन २०१५ २०२० या कालावधीत कोणतीही कामे न करता कामे पूर्ण झाल्याचे कागदपत्रे दाखवून लाखो रुपयांच्या निधीची संगनमत करून अपहार केला. या सदर भ्रष्टाचाराप्रकरणी गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी विस्तार अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौकशी अधिकाऱ्याने मांजरमच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः उपस्थित राहून पंचांसमोर प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. केलेल्या चौकशीचा अहवाल ता.२२ सप्टेंबर २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना सादर केला. त्यात असे नमूद केले आहे की, १४ व्या वित्त आयोगाच्या संपूर्ण नोंदी तपासल्या असता ग्रामसेवक, सरपंच आणि कनिष्ठ अभियंता यांनी संगनमत करून आर्थिक लाभ मिळवल्याचे आढळून आले आहे.
मांजरम ग्रामपंचायतच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले असताना पंचायत समितीच्या स्तरावरुन कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. उलट भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचीच भुमिका घेतली. त्याचबरोबर या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असतांनाही काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते तथा अर्धापूरचे नगरसेवक शेख जाकेर यांनी या प्रकरणी नायगाव येथील न्यायालयात दाद मागितली.
दाखल प्रकरणात शेख जाकेर यांनी मांजरमचे तत्कालीन सरपंच स्वाती सुरेश योगेकर, ग्रामसेवक सुधाकर वडजे व पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता एम.ए. जीरवणकर यांनी संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत २४ लाख ५० हजार ७३४ रुपयाचा अपहार केल्याचे कागदोपत्री सिध्द होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
वरील तीनही आरोपींनी गैर व्यवहार व बेकायदेशीर कृत्य करुन करुन लाखो रुपयांचा अपहार करुन शासनाची घोर फसवणूक केली आहे. गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झालेले असून त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. सदरील प्रकरणाचे गांभिर्य तसेच प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलीसामार्फत सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत प्रकरणातील शासकिय साक्षीदार यांचे जाब-जबाब नोंदविण्यासाठी तसेच विविध शासकिय कार्यालयातुन इतर पुरावे हस्तगत करण्यासाठी पोलीसांमार्फत तपास होणे आवश्यक आहे असेही नमूद केले.
वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नायगाव येथील न्यायालयाने या प्रकरणी नायगाव पोलिसांना गुन्हा नोंद करुन चौकशी केलेल्या प्रकरणाचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात मांजरमचे तत्कालीन सरपंच स्वाती सुरेश योगेकर, ग्रामसेवक सुधाकर वडजे व पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता एम.ए. जीरवणकर यांनी संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत २४ लाख ५० हजार ७३४ रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक पंडीत हे करत आहेत.
सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर तत्काळ कारवाई होणे आवश्यक असतांना नायगावचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी चालढकल करत होते. पण दि. २ डिसेंबर च्या मध्यरात्री अखेर गुन्हा नोंदवणे भाग पडले.