तहसीलदारांचा वाळू माफीयांना दणका : राहेर तेथे वाळू उपसा करणारे साहित्य केले जप्त
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील राहेर येथील गोदावरीच्या नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. कडक थंडीचे दिवस असतांनाही माहिती मिळताच तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेवून सोमवारी रात्री उशीरा गोदावरी नदी पात्र गाठून वाळू उपसा करणारे साहित्य जप्त केले. कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक येत असल्याची माहिती लिक झाल्याने माफीयांनी ज्या बोटीच्या सहायाने वाळू उपसा करत होते ती बोट अंधाराचा फायदा घेवून पळवली. तरीही रात्रभर पळवलेल्या बोटीचा शोध घेतला परंतु हाती लागली नाही.
नायगाव तालुक्यातील राहेर येथे मागच्या काही दिवसापासून बोटीच्या सहायाने वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. महसूल विभागाला या प्रकाराची माहिती मिळू नये यासाठी माफीया काळजी घेत होते. तरीही सदरची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मिळाली. त्यांनी या प्रकाराला पाळत ठेवून दि. ६ जानेवारी रोजी रात्री उशिरा तलाठी डाकेवाड, पवार, महसूल कर्मचारी देवकते, चालक पुरी व अन्य काही कर्मचाऱ्यांना सोबत घेवून राहेरचे गोदावरी नदीपात्रात गाठले. यावेळी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यात येणारे पाईप लोखंडी टाक्यांना बांधून असल्याचे दिसून आले पण वाळू उपसा करणारी बोट मात्र दिसली नाही.
महसूलचे पथक कारवाई करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच माफीयाने वाळू उपसा करणारी बोट धर्माबाद तालुक्याच्या दिशेने पळवली असल्याचे समजले. त्यामुळे तहसीलदार गायकवाड यांनी धर्माबाद तहसीलदारांशी संपर्क साधला पण त्यांची यंत्रणा मदतीला आली नाही पण धर्माबादचे पोलीस निरीक्षक मात्र आले होते. त्यांनाही पळवलेल्या बोटचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे त्यांना नदीपात्रात जाता आले नाही. त्यामुळे बोट पळवून नेण्यात वाळू माफीया यशस्वी झाले.
जप्त केलेल्या साहित्य आणण्यासाठी रात्री राहेर परिसरात कुठलेच वाहण मिळत नसल्याने नायगाव येथून ट्रक्टर घेवून जावे लागले. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत नदीपात्राजवळ तळ ठोकून तहसीलदार गायकवाड व त्यांच्या पथकाने जप्त केलेले साहित्य ट्रक्टरमध्ये भरुन तहसील कार्यालयात आणले. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही तहसीलदार गायकवाड व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.