जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळणार- खा.रवींद्र चव्हाण
अंकुशकुमार देगावकर
नांदेड :- काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख होती, काँग्रेसची एक वेगळी विचारधारा आहे, जनाधार आहे, आव्हाने कितीही असले तरी आगामी काळात काँग्रेसला गतवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे, असा ठाम विश्वास खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान यावेळी कंधार तालुकाध्यक्षपदी संजय भोसीकर, तर लोहा तालुकाध्यक्षपदी मधुकरराव दिघे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील काँग्रेसची वाटचाल, ध्येयधोरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यत पक्षबांधणीसाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आगामी नांदेड महानगरपालिका तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष आपली ताकद दाखवून देईल, विधानसभा निवडणुकीत पक्ष कुठे कमी पडला, याचीही चाचपणी व विचारमंथन होणार आहे.
याच संदर्भात नायगाव येथे पक्षाची व्यापक बैठक होणार असल्याची माहिती खा.चव्हाण यांनी दिली. कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्ष थांबत नसतो, पक्षात येणार्यांचीही संख्या वाढतच राहील, असे एका प्रश्नाच्या उत्तरात खा.चव्हाण म्हणाले. नांदेड आणि कृष्णूर एमआयडीसीचा विस्तार पाहता जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जावेत, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळावा यासाठीही केंद्र सरकारकडे आपला पाठपुरावा सुरु असून रेल्वे विषयक सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुकाध्यक्ष भोसीकर, दिघे यांची निवड यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी कंधार तालुकाध्यक्षपदी संजय ईश्वरराव भोसीकर तर लोहा तालुकाध्यक्षपदी मधुकरराव दिघे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. पक्षात गळती होत असल्याचा अपप्रचार सुरु असल्याचे सांगून बेटमोगरेकर म्हणाले पक्ष मजबूत स्थितीत आहे, जे आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते, ते आता काँग्रेस सोडून गेले आहेत. अन्य तालुकाध्यक्ष तसेच पदाधिकार्यांच्या रिक्त जागांवर लवकरच नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
महापालिका, जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास विकास आघाडी ताकदीने लढणार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असून नायगाव येथील पक्षाच्या बैठकीत पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचे बेटमोगरेकर म्हणाले. पत्रकारांचा सन्मान यावेळी पत्रकार दिनानिमित्त खा.रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, श्याम दरक,राजन देशपांडे, राजेश पावडे, शमीम अब्दुल्ला, केदार साळुंके, श्रावण रॅपनवाड, करुणा जमदाडे, व्यंकट मोकले, बाबुराव पाटील यांचीही उपस्थिती होती.