मनरेगाच्या नवीन कामांना परवानगी : गटविकास अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव पंचायत समितींतर्गत मनरेगाच्या कामात संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून. नवीन कामे सरु न करण्याबाबत कडक निर्देश असताना गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी निर्देशाला केराची टोपली दाखवून तब्बल २९ नवीन कामे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या नवीन कामांना परवानगी देताना यात मोठा अर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा होत असून हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहचले असल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नायगाव तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यापासून ते रोजगार सेवकापर्यत मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार पोहचला आहे. मजुराऐवजी जेसीबीने कामे करणे, बोगस मजूर दाखवणे, दिवसातून दोनदा हजेरी घेण्याऐवजी एकदाच हजेरी घेतल्याचे दाखवणे, प्रस्ताव एका जागेचा काम दुसऱ्याच ठिकाणी असे प्रकार करुन मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात येत आहे. पांदन रस्ते, सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाकच्या कामात ६०:४० प्रमाण न राखने असा प्रकार सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मनरेगातील भ्रष्टाचारात नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांच्यासह कार्यक्रम अधि, संगणक चालक,ग्रासमेवक व रोजगार सेवक सहभागी आहेत.
मनरेगात भ्रष्टाचार करताना नायगाव पंचायत समितीने कुठलेच नियम तर पाळले नाहीतच पण मनरेगा आयुक्त नागपूर यांच्या पत्रालाही कचरा कुंडीत फेकून नायगाव तालुक्यातील बळेगाव, चारवाडी, इकळीमाळ, हिप्परगा जाने. हुस्सा, कहाळा खु, कोठाळा, मांजरम, मनूर त.ब., मरवाळी तांडा, परडवाडी, रुई, सालेगाव, सांगवी, सोमठाणा, सुजलेगाव, तलबीड व टेंभुर्णी अदि गावात मातोश्री पांदन रस्ता, सिमेंट रस्ते, खडीकरण, पेव्हर ब्लाक कामे सुरु करण्यास पंचायत समितीच्या स्तरावरुन परवानगी दिली.
वास्तविक नविन सार्वजनिक कामांना वर्क कोड देण्यात येवून नये तसेच वर्क कोड देवूनही अद्याप सुरु न झालेली सार्वजनिक कामे सुरु करण्यात येवून नयेत. असे स्पष्ट निर्देश मनरेगाचे जिल्हा समन्वयक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी (ता. ६) डिसेंबर २०२४ रोजी दिले होते तरीही गटविकास अधिकाऱ्यांनी हा उद्दामपणा केला आहे.
नायगाव तालुक्यात मनरेगाच्या विविध कामात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे पंचायत समितीची तालुक्यात चांगलीच शोभा तर होत आहेच पण होणाऱ्या भ्रष्टाचाराचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये सुरु असलेल्या या अनागोंदी कारभाराचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहचले असल्याने मनरेगातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची तर शक्यता वाढलीच आहे पण गटविकास अधिकारी एल.आर. वाजे हे पण अडचणीत येण्याची शक्यता पंचायत समितीच्या वर्तूळात होत आहे.