ओव्हरलोडींग वाळू वाहतुक प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
◆ वाहन मालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल मात्र वाळू घाटाचा ठेकेदार मात्र मोकाट
कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलिसांनी कुंडलवाडी ते दौलापूर रोडवर दि.१ फेब्रुवारी रोजी ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई करून वाळू वाहतुक करणा-या ट्रक मालक व चालकावर गुन्हे दाखल केले आहेत.पण या प्रकरणी मुख्य आरोपी वाळूघाट ठेकेदारास मोकाट सोडल्याने कुंडलवाडी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. काही घाट शासकीय व खाजगी सध्या सुरू असून या वाळूघाटातून ओव्हरलोड अवैध वाळू वाहतूक होत आहे. महसूल प्रशासनाने दिलेल्या पावत्यावर ठेकेदाराकडून खडाखोड करून मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून वाळू उत्खनन करून ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे.
तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावावर वाळू उपसा करून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे.राँयल्टी पावत्यावर खडाखोड करून वाळू ठेकेदार,वाहन मालक व चालक तसेच महसूल प्रशासनातील अधिका-यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
दि.१ फेब्रुवारी रोजी कुंडलवाडी पोलिसांनी कुंडलवाडी ते दौलापूर रोडवर दोन ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केली.यात प्रत्येक ट्रक कडे ३ ब्रास ची पावती असताना त्यात ७ ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांनी दोन्ही ट्रक मालक व चालक अशा चार जणांवर गुन्हे दाखल केले. पण पावत्यावर खडाखोड करून एका ट्रक वाहन मालक व चालकास ३ ब्रासची पावती देऊन ७ ब्रास वाळू देणाऱ्या वाळू ठेकेदारास मात्र या कारवाईत मोकाट सोडल्याने कुंडलवाडी पोलिसांच्या कारवाईवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
वाळू उत्खनन व वाळू वाहतुकीसंबधी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवीत राँयल्टी पावत्यावर खडाखोड करीत शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित वाळू ठेकेदारास मुख्य आरोपी करण्याऐवजी ठेकेदारास या कारवाईत मोकाट सोडल्याचे कुंडलवाडी पोलिसांच्या कारवाईतून दिसून येत आहे.
कुंडलवाडी पोलिसांनी ओव्हरलोड वाळू वाहतूक विरुद्ध कारवाई करून ट्रक मालक व चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. शासनाच्या गौण खनिज वाळूची दिवसाढवळ्या चोरी करून कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बडवणाऱ्या संबंधित वाळू ठेकेदारावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लक्ष घालून या कारवाईत वाळू ठेकेदारास मुख्य आरोपी करतील काय असा प्रश्न जनमानसांतून उपस्थित होत आहे.