वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहणे बंधनकारक : जिल्हा शल्यचिकित्सकाच्या कडक सुचना
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शासनाचा गलेलठ्ठ पगार घेवूनही दांड्या मारणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी अधिक्षकांना पत्र पाठवून कान टोचले असून. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करुन राहण्याबाबत आदेश देण्यात यावेत तसेच रुग्णालयात कामावर वेळेवर हजर राहून रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात यावी अशा कडक सुचना दिल्या आहेत.
येथील ग्रामीण रुग्णालयात एका वैद्यकीय अधिक्षकासह १४ वैद्यकीय अधिकारी असताना यातील एकही अधिकारी मुख्यालयी तर राहतच नाही पण नियमित उपस्थितही राहत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेवूनही दांड्या मारणाऱ्या या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिट अतिशय महत्त्वाचे आहे कारण.
नायगाव शहर हे महामार्गावरील शहर असून येथे ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर आहे. या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने सेवा मिळण्यासाठी ट्रामा केअर युनिट आले पण या ट्रामा केअरच आजपर्यंत ड्रामा चालू असून अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी वेळेला एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाहीत.
वैद्यकीय अधिक्षकाची नियुक्ती झाली पण ते ही नांदेडवरुनच त्यांच्या सोईनुसार नायगावला ये जा करतात. माझे वरिष्ठांशी जवळचे संबंध असल्यामुळे माझे कुणीही काहीही करु शकत नाही या अविर्भावात वावरतात. तसेच इतर वैद्यकीय अधिकाऱ्यावल देखील त्यांचे कुठलेच नियंत्रण नसल्याने आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आली आहे.
नायगाव ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही मिळाली. त्यांनी आरोग्य संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी वास्तव्य करुन राहणे अनिवार्य असून रुग्णांना वेळेवर सेवा उपलब्ध करुन दयाव्यात याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी नुकतेच नायगावच्या वैद्यकीय अधिक्षकास पत्र पाठवून कडक सुचना दिल्या आहेत.
आपल्या अधिपत्याखालील सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी वास्तव्य करुन राहण्याबाबत आदेश देण्यात यावेत तसेच रुग्णालयात कामावर वेळेवर हजर राहून रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात जेणे करुन लोकप्रतीनिधी मार्फत तक्रारी उद्भवणार नाहीत याची नोंद घ्यावी असे कळवले आहे.
सर्वच आदेश धाब्यावर बसवणारे मुजोर वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकाचे आदेश पाळतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.