नांदेड जिल्ह्यात ‘पत्रकार संरक्षण कायद्या’अंतर्गत पहिला गुन्हा दाखल; अर्धापूर पोलिसांकडून पाचही आरोपींना बेड्या

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :– पत्रकारांवरील हल्ले आणि त्यांना धमकावण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्ह्यामध्ये ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृती आणि मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम’ (पत्रकार संरक्षण कायदा) अंतर्गत पहिला गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष बोले याच्यासह पाच जणांना तात्काळ अटक केली आहे.
तक्रारदार रामचंद्र उर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे (वय ३९ वर्ष) हे ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’चे पत्रकार असून अर्धापूर तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांनी २५ मार्च २०२६ रोजी ‘लहान’ गावात बेकायदेशीर डीजे आणि अवैध दारूविक्री संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा राग मनात धरून, २६ मार्च रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आरोपी संतोष बोले आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी पत्रकाराला अडवले.
अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार मनपुर्वे हे त्यांच्या मित्रासोबत बोलत असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांना गाठले. “तू आमच्या गावची बातमी का छापली? तुला काय अधिकार आहे?” असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींनी पत्रकाराला धक्काबुक्की केली. इतकेच नव्हे तर, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित पत्रकाराने आरडाओरडा केल्याने त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ धावून आले, त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
या घटनेनंतर पत्रकार रामचंद्र मनपुर्वे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ दाखल केला आहे.
या कलमान्वये गुन्हा दाखल:
- BNS कलमे: १३७(२), ६२, ११५(२), ३५१(२), ३५१(३), १८९(२)
- पत्रकार परिषद अधिनियम १९८९: कलम ४
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भोसले यांनी तपास चक्र फिरवून मुख्य आरोपी संतोष बोले याच्यासह सर्व पाचही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने पत्रकार वर्तुळातून प्रशासनाचे स्वागत केले जात आहे.



