कुंटूरच्या वाचनालयाचे साने गुरुजी सेवा सन्मान पुरस्कार जाहीर
दत्ता बारगजे, डॉ.बालाजी कोंपलवार व रेखाताई कांबळे मानकरी

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- कुंटूर ता.नायगाव येथील पू.साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे साने गुरुजी सेवा सन्मान पुरस्कार २०२४ नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार बीड येथील एच.आय.व्ही. बाधित बालकांसाठी काम करणारे ज्येष्ट समाजसेवक दत्ता बारगजे यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.बालाजी कोंपलवार यांंना आणि गावस्तरीय बचतगट प्रेरक रेखाताई अनिल कांबळे यांना देण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल पुष्पहार असे आहे. हे पुरस्कार दि. ३ एप्रिल रोजी होणाऱ्या स्व.गंगाधरराव कुंटूरकर स्मृती समारोह व साने गुरुजी प्रबोधन व्याख्यानमालेच्या समारंभात माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे साने गुरुजींची धडपडणारी मुले या युवा चळवळीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.