भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार ; मारतळा येथील घटना

बालासाहेब शिंदे
मारतळा :- शेताकडून गावाकडे रस्ता ओलांडणाऱ्या एका युवकास भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना दि.१२ शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावरील मारतळा गावाजवळ घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात त्या फरार अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मारतळा ता.लोहा येथील रहिवासी असलेला प्रथमेश शिवाजी इर्लेवाड वय १८ वर्ष याचे शेताकडून गावाकडे येत असताना नांदेड हैदराबाद महामार्गावरील मामासाहेब महाराज यांच्या समाधी मंदिरात लगत रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने इर्लेवाड यास धडक दिली. या दुर्दैवी अपघातात तो जागीच ठार झाला. यानंतर ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.
ऐन श्री.हनुमान जन्मोत्सव दिनी ही दुर्दैवी घटना घडली असून मयत प्रथमेश इर्लेवाड हा आपल्या आई वडीलास एकुलता एक पुत्र होता त्याच्या पश्चात आई-वडील तीन मुले असा परिवार असून त्याचे वडील शिवाजी इर्लेवाड हे रापम एसटी महामंडळाच्या बिलोली आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत आपल्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने इर्लेवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.