रिकामे टिपर पकडणाऱ्या महसुल प्रशासनाला भरली वाहने कशी दिसत नाहीत??
अवैध मुरूम वाहतुकीविरुध्द धर्माबाद पोलिसांची दबंग करवाई!!

मीना राजू भद्रे
धर्माबाद :- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने सर्वत्र अवैध धांद्यावर कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. धर्माबाद तालुक्यात वर्षभर नियमबाह्य मुरुम, वाळू वाहतूक चालूच होती महसूल विभागाने यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्यानें इथे कायद्याचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
मस्तवाल झालेल्या अवैध मुरूम वाळू माफियांपुढे महसूल विभागाने अक्षरशः नांगी टाकून दिल्याने हे व्यवसाय भर दिवसा सुरू होते. धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड व त्यांच्या पथकाने अवैध मुरूम तस्करी करणारे चार ट्रीपर ताब्यात घेतले आहेत.
धर्माबाद तालुक्यात यंदाच्या वर्षी एकही वाळूचा घाट लिलावात नव्हता तरी पण आज रोजी देखील खुलेआम वाळू वाहतूक होते तसेच पठारी भाग नाहीत तरीही नाम मात्र मुरुमाची रॉयल्टी काढून अक्षरशः वारेमाप ब्रास मुरूम काढले जाते सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही ठिकाणीं तक्रार आली की दोन दिवस बंद पुन्हा सगळा खेळ नियमित सुरू असतो. पोलीस प्रशासनाने धडाकेबाज करवाई करीत चार हायवा ट्रीपर पोलीस ठाण्यात लावले असून दंडात्मक कारवाईसाठी आता महसुल कडे हे प्रकरण जाणार आहे.
मूळात महसूल विभागाने स्वतः करवाई न करता या प्रकाराकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे अभय दीले होते त्यामुळे दंड लावताना देखील कायद्याच्या पळवाटा शोधल्या जाऊ नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. पोलीस पथकाने पकडलेली वाहने पुढील प्रमाणे आहेत. एम एच 45- 1249, एम एच 44- 9404, एम एच 26 – 5578, एम एच 26 – 4284 हायवा पकडून दबंग कार्यवाही केली आहे.
पोलीस प्रशासनाने या पूर्वी देखील एक वाळूचा हायवा पकडला होता आणि तो तहसिल कार्यालयापुढे लावला तिथून भरदिवसा वाळू माफियांनी गाडी पळवली तरीही महसूल विभाग मौनच होते. तदनंतर या विषयाकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे लक्ष वेधले गेले आणि पुन्हा चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक महसूल चे अधिकारि आणि संबधीत वाळू मुरूम माफिया यांचे भ्रमणध्वनी रेकॉर्ड तपासल्यास सर्व पितळ उघडे पडेल आणि या सिंडिकेट मध्ये किती वाहने आहेत त्यांच्याकडून किती रुपये दरमहा निश्चित आहेत याचाही पर्दाफाश होईल पण हे धाडस महसुलचे वरिष्ठ अधिकारी करतील का हे मात्र सस्पेन्स आहे. वर्षभर मुरूम वाळू वाहतुकीस अप्रत्यक्ष अभय देणारे महसूल विभागाने जून महिन्यात एक रिकामे टिपर पकडुन आपला नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न केला.
भरदिवसा ओव्हरलोड वाहने त्यांना दिसली कशी नसतील आणि रिकामे टीपर कसे काय सापडले हे एक कोडे बनले आहे. तहसिल कार्यालयाच्य परिसरातील वाळूचे ढिगारे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी कान टोचले पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण वाहतूक अद्यापही सुरूच आहे हे पोलीस कारवाईतून ठळक उमटून पडत आहे.