ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

माहूरमध्ये वाळू तस्करांवर महसूल पथकाची भर पावसात धडाकेबाज कारवाई… प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोठा मासा गळाला; लाखोंचा मुद्देमाल ताब्यात!

एक हायवा,दोन टिप्पर,एक ट्रॅक्टर सह टू टेन जेसीबी जप्त...

साजीद खान

माहूर: माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पडसा घाटातील मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुलाखालून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती अवैध गौण खनिज नियंत्रण पथकाला मिळाली. त्यानंतर किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे सह मंडळ अधिकारी, तलाठी व तसेच सिंदखेड आणि माहूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत भर पावसात मोठी कारवाई केली असून यामध्ये एक हायवा, दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर सह टू टेन जेसीबी जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आले आहे.

किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली ह्या प्रारंभापासूनच गौणखनिज तस्करी रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करत आहेत. माहूर तहसील कार्यक्षेत्रांतर्गत स्थिर पथक, भरारी पथक नेमून विशेषत: वाळू तस्करी रोखण्यासाठी सक्तीचे आदेश दिले होते, त्यावरून प्रभारी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड व अवैध गौण खनिज नियंत्रण पथकाचे नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या नेतृत्वात काल दिनांक १९ जूनच्या रात्री १० :३० पासून २ :३० पर्यंत भर पावसात पैनगंगा नदीच्या पडसा घाटावर नदीपात्रातील पुलाखाली मोठी मोहीम राबवून गब्बर वाळू तस्करांचे मुस्के आवळण्यात माहूर महसूल पथकाला यश मिळाले आहे.माहूर तालुक्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

माहूर तालुक्यात वाळू तस्करांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.पैनगंगा नदी पात्रात या वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. रात्रं-दिवस बेसुमार पद्धतीने अवैध वाळू उपसा सुरू आहे.या विरूद्ध महसूल विभागाने अनेक वेळा कारवाई करूनही ही अवैध वाळू तस्करी थांबली नाही.दरम्यान दिनांक १९ जूनच्या रात्री नायाब तहसीलदार कैलास जेठे व तलाठी बाबर यांना पडसा नदीपात्रातील पुलाखाली जेसीबी मशीनच्या साह्याने वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी जायमोक्यावर पाळत ठेवून अवैध गौण  खनिज पथक प्रमुख तथा प्रभारी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांना माहिती दिली. त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळ गाठले व धो धो पडत असलेल्या पावसात नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उत्खनन करणारे वाहने जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एम.एच.२६ सी.एच.११०२ क्रमांकाचे दहा चाकी हायवा ट्रक,एम.एच.२९ बी.ई.५०१० व एम.एच.२८ ए.बी.७४०१ या क्रमांकाचे सहा चाकी टिप्पर, एक निळ्या रंगाचा सोनालीका ट्रॅक्टर त्याचा क्रमांक एम.एच.२९ बी.सी.३३५६ व यासोबतच टू टेन हुंडाई २१५ एल पोकलेन मशीन जप्त करण्यात आले आहे.

कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी

अवैध गौण खनिज पथक प्रमुख तथा प्रभारी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह मंडळ अधिकारी विद्यासागर पाईकराव, श्री.कवडगावे, संदीप फुलारी, तलाठी चंद्रकांत बाबर, विष्णू राजुरवार, पोलीस पाटील पवन बेहेरे यांच्यासह सिंदखेड आणि माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. एकंदरीत कालचा दिवस वाळू तस्करांसाठी कर्दनकाळ ठरला कारण, दिवसा नदीपत्रात चाळून ठेवलेले वाळूचे ढिगारे माहूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसीलदार यांनी संयुक्तरीत्या जेसीबीच्या साह्याने चाळलेली वाळू नदीपत्रात मिसळून टाकली,तोच रात्री परत वाळूची चोरी करताना वाहने जप्त करण्यात आल्याने माहूर तालुक्यातील इतिहासातील ही पहिली वहिली मोठी कारवाई ठरली आहे.

 गौण खनिजावर कॉन्ट्रॅक्टर लॉबी’चा डोळा…

माहूर तालुक्यात मागील काही वर्षापासून महसूल विभागातीलच अधिकाऱ्यांच्या मदतीने व अर्थपूर्ण संबंधातून कॉन्ट्रॅक्टर लॉबीने तालुक्यातील गौण खनिजावर डोळा ठेवून आपले पाय पसरविले होते. बांधकाम व्यवसायाआड गौण खनिजाचा मोठा व्यवसाय इथे सुरू होता. परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचे सौजन्य दाखविले नव्हते, त्यामुळे आज पहाटेपासूनच माहूर तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले असून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांचे मात्र या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker