कुंडलवाडी नगरपरिषदेकडून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम
◆ संत ज्ञानेश्वर महाराज मुर्ती/प्रतिमेचे पालखी मिरवणूक ◆ स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान ◆ध्वजारोहण सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी होणार ◆कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची माहिती

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिकेकडून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्या आदेशानुसार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार असून यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमा/मूर्ती यांची शहरातील विविध मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच शहरातील शाळांनीही प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा व विविध महापुरुषांच्या वेशभूषा कार्यक्रम घेण्याबरोबरच तिरंगा प्रतिज्ञा व स्वच्छता प्रतिज्ञा ही ध्वजारोहण कार्यक्रमानंतर घेण्यात यावेत या कार्यक्रमात शहरातील सर्व शाळांनी भाग घेण्याबरोबरच सर्व नागरिकांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद कार्यालयात दि.१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील शाळांचे मुख्याध्यापक, पत्रकार संघाचे अध्यक्ष व नगरपालिका कर्मचाऱ्यांची बैठक मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी घेतली. यावेळी माहिती देताना मुख्याधिकारी दीपक मोरे म्हणाले की, १५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन या निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती /पालखी यांची पालखी काढण्यात येणार आहे. मिरवणूकीची सुरुवात नगरपालिकेपासून डॉ.हेडगेवार चौक-संत गोरोबाकाका चौक-जोड मारुती मंदिर ते कुंडलेश्वर मंदिर येथे समारोप करण्यात येणार आहेत.
शहरातील शाळांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा तसेच महापुरुषांच्या वेशभूषा व वारकरी रूपातील वेशभूषा करण्यात यावेत व शाळेमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा व स्वच्छता प्रतिज्ञा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी घ्यावेत. नगर परिषदेमध्ये तिरंगा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांनी तिरंगा सेल्फी पॉईंट येथे फोटो काढावेत. कुंडलवाडी नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी व सर्व शाळांनी भाग घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी यावेळी केले.



