मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा…

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : गुरुवारी सकाळी नदीला आलेल्या महापुराने शेतातील पिकांचा चिखल झाला तर पुराचे पाणी घरादारात गेल्याने संसार तर उघड्यावर पडलेच आहे. याच पुराने चिमुकल्यांचे शैक्षणिक साहित्यही पाण्याने भिजले. भिजलेली पुस्तके पुन्हा वापरता यावी यासाठी शुक्रवारी सकाळी पिंपळगावच्या दोन बहीण भावाने पुस्तके चक्क उन्हात वाळू घातल्याचे दिसून आले. या चिमुकल्यांची कृती पाहता त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ अनेकांच्या नजरेतून सुटली नाही.
नायगाव शहरात दि.२८ रोजी नदीलाआलेल्या पुराच्या पाण्याने व्यापाऱ्याच्या दुकानातील साहित्य, गादी मार्केट मधील अनेक दुकानातील इलेक्ट्रानिक मशीनरी सह साहित्य, घरातील साहित्यासह मुलांचे शैक्षणिक साहित्य सुद्धा पुरात भिजले असल्याने नायगाव शहरातील जुन्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नायगाव शहरालगत असलेल्या पिंपळगाव गावाला देखील पुराच्या पाण्याने वेढले होते त्यामुळे नदीलगत असलेली अनेकाची घरे पाण्याखाली गेली होती. त्यातीलचं एका गरीब कुटुंबातील लक्ष्मण बाबा ऱ्यापनवाड यांच्या घरात पाणी शिरले अन घरातील संसार उपयोगी साहित्य भिजले. दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलगी सुचिता व सातव्या इयत्तेत शिकणारा मुलगा शैलेश या चिमुकलीचे शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात भिजले. दोन चिमुकल्या बहीण भावाचे शैक्षणिक साहित्य पाण्यात भिजल्याने ते कुठेही डगमगले नाहीत.
घरातील गरीब परिस्थितीची जाण असलेल्या चिमुकलीने शैक्षणिक साहित्य पुन्हा वापरात यावे यां उद्देशाने ती बाहेर रस्त्यावर उंच भागात वाळत घातली होती. चिमुकलिंची शिक्षणाप्रति असलेली आत्मीयता अन घरची नाजूक परिस्थिती यातून दिसून येत होती. पूरपरिस्थिती असताना संकटांना कसे दोन हात करायचे या चिमुकलीकडून आदर्श घेण्यासारखा आहे.



