उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची तत्परता : टाकळी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकाचा जीव वाचला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शनिवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान वझरगा येथील मारोती हनमंत कोकणे हे मन्याड नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टाकळी खु. येथून वाहून गेला मात्र झाडाचा सहारा मिळाल्याने झाडाचा आश्रय घेवून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सौ.क्रांती डोंबे यांना मिळाली. त्यांनी तातडीने बोट पाठवून पुराच्या पाण्यात झाडावर आश्रय घेतलेल्या नागरीकास सुखरूप बाहेर काढले. डोंबे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
शनिवारी सकाळी सकाळी 8.30 वाजता तलाठी अटकळी यांनी क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली यांना कळविले की, मौजे टाकळी खुर्द येथे मन्याड नदीच्या पुरामध्ये एक इसम वाहून गेला गेला असून त्याने झाडावर आश्रय घेतला आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी बालाजी मिठेवाड नायब तहसीलदार बिलोली यांच्यासह राजेश्वर आलमवाड सहाय्यक महसूल अधिकारी, शेख युनूस महसूल सहाय्यक व आशिष जनार्दन आंबोडे, बोट ऑपरेटर यांच्यासह पथकास टाकळी खुर्द येथे पोचून संबंधित व्यक्तीला पुरातून बाहेर काढण्यासाठी निर्देश दिले.
सदरील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी बोट घेऊन टाकळी खुर्द येथे पोहोचून बोट नदीमध्ये टाकून संबंधित व्यक्तीला बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्याचे नाव मारोती हनमंत कोकणे राहणार वझरगा असे आहे. सदरील व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर , ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे, शिवाजी घोंगडे, चव्हाण, ललित पाटील, मिलिंद सुपेकर, बीट जमादार काळे, पोलीस प्रशासन व टाकळी गावचे सरपंच व गावकरी तसेच अटकळी गावच्या लोकांनी सहकार्य केले आहे.



