पालकमंत्र्यांनी भेट दिली नसल्याने ग्रामस्थांनी चक्क चिखलात बसून सुरु केले आंदोलन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव तालुक्यातील पुर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी कुंचेली येथे भेट दिली पण ज्या जुन्या कुंचेलीत महापुराने थैमान घातले तेथे भेट न देता दौरा आटोपता घेतल्या. त्यामुळे जुन्या कुंचेलीतील पुरग्रस्त नागरिक संतप्त झाले असून त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात चक्क चिखलात बसून आंदोलन सुरु केले आहे. मात्र या आपदग्रस्थ नागरिकांची समजूत काढण्यासाठी तहसीलदार व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी गेले आहेत.
दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नायगाव तालुक्यात हाहाकार माजवला तर जुन्या कुंचेलीला मन्याड नदीच्या पुराने वेढा घातला होता. त्यामुळे तेथे 85 नागरिक अडकून पडले होते. त्या नागरिकांना प्रशासनाने विशेष पथक बोलावून सुरक्षित बाहेर काढले होते. पण पुराच्या पाण्यानी शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शनिवारी नायगाव दौऱ्यावर आलेले पालकमंत्री ना. अतुल सावे हे जुन्या कुंचेली येथे भेट देवून आमच्या अडचणी समजून घेतील अशी पुरग्रस्त नागरिकांची अपेक्षा होती.
पालकमंत्री कुंचेलीत आले पण नवीन गावातच दहा मिनिटे वेळ दिला आणि त्यांनी कुंचेलीचा दौरा आटोपता घेतला. पालकमंत्री ज्या भागात भेट देवून पाहणी करणे आवश्यक होते तेथे न गेल्याने जुन्या कुंचेलीतील पुरग्रस्त संतप्त झाले असून. पालकमंत्र्याचा निषेध करत चक्क चिखलात आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाला बसलेल्यांचे मन वळवण्याचे काम तहसीलदार धम्मप्रीया गायकवाड व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस विक्रम हाराळे हे प्रयत्न करत आहेत.
पुढे बिलोली तालुक्यात जायचे असल्याने पालकमंत्री पुर परिस्थितीची आढावा घेवून गेले. मात्र ज्या भागात नुकसान झाले तिथे न गेल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त करत आंदोलन सुरु केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली आहे.
धम्मप्रीया गायकवाड, तहसीलदार नायगाव.



