संपूर्ण जिल्हात ओला दुष्काळ, पंचनामे बाजूला ठेवून तात्काळ मदत करा – खा.रवींद्र चव्हाण

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चारशे ते पाचशे गावांना पावसाचा वेढा होता. मात्र पाणी ओसरल्यानंतर पालकमंत्री येतात हे दिरंगाई योग्य नाही. केवळ पाहणी दौरे होते आहेत मात्र मदत काहीच मिळत नाही. मागील मदत अद्यापही मिळालेली नाही. पालकमंत्री मोजक्याच गावांना भेटी देत असल्याने जनतेत प्रचंड रोष आहे. २००६ मध्ये जिल्ह्यात पूर परिस्थिती होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आले होते त्यावेळी तातडीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली होती. पण आजचे सरकार गंभीर नाही. पंचनामे बाजूला ठेवून बाधितांना तात्काळ प्रत्येकी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे खा.रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या अनुषंगाने खा.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कडून शहरी व ग्रामीण भागात पाहणी करण्यात आली. यानंतर शनिवार (दि.३०) रोजी काँग्रेस कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खा. रवींद्र चव्हाण हे बोलत होते. यावेळी ग्रामीण भागातील पूर परिस्थिती बदल दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी तर शहरातील पूरपरिस्थिती बदल महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी अवगत केले. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे तर शहरी भागात मनपाने पावसाळापुर्वीचे कामे, नालेसफाई न केल्याने शहराला पूराचा फटका बसला आहे. अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील पूर परिस्थिती बदल सरकार तत्पर नसल्याचा आरोप खा.रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला.
यावेळी खा.रवींद्र चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, डॉ.श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडसकर, मसुद खान, डॉ.यशपाल भिंगे, शमिम अब्दुला, आनंद चव्हाण, प्रफुल्ल सावंत, महेश देशमुख तरोडेकर, विठ्ठल पावडे, बालाजी चव्हाण, गंगाधर सोंडारे, सुनील वानखेडे, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, डॉ.करुणा जमदाडे, निरंजन पावडे, मन्तजिब, बापूसाहेब पाटील, अतूल पेदेवाड, आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाहणी दौऱ्यात खासदार या नात्याने मला निमंत्रण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र निमंत्रण देण्यात आले नाही. नायगाव माझा तालुका आहे तरी देखील मला डावलून माझ्या तालुक्यातील पाहणी केली. यातून काय साध्य करायचे आहे, कळत नाही अशी नाराजी स्थानिक प्रशासनाबदल व राज्य शासनाबदल खा.रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.



