विशेष पॅकेजच्या मागणीसाठी अतिवृष्टीग्रस्तांसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नायगांवमध्ये आंदोलन…

New Bharat Times नेटवर्क
नायगांव :– विशेष पॅकेजद्वारे आर्थिक मदत तसेच, जनसामान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अतिवृष्टीग्रस्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने नायगांव तहसील कचेरीसमोर आज दि.४ सप्टेंबर रोजी धरणे व निदर्शने आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांचे गाऱ्हाणे वरिष्ठांना कळवू असे सांगितले.

नायगांव (खै.) तालुक्यासह संपूर्ण नादेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्रासाठीचा सन् २०१९ तसेच, दि.१७ नोव्हेंबर २०२२ व दि.१ जानेवारी २०२४ शासननिर्णयांच्या तरतूदीसह विशेष पॅकेज द्या. ज्यात- सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार व अन्य आर्थिक मदत द्या, नदी-नाल्यालगतच्या शेतजमिन खरडलेल्या शेतकऱ्यांना किमान १ लाख रुपये विशेष पॅकेजमधून आर्थिक मदत द्या, अतिवृष्टीत मयत जनावरांचे पालकांना व शेतीतील औजारे, गुरांचे गोठे व अन्य उपकरणे वाहून वा नासधूस झालेल्यांना सद्याच्या बाजारमूल्यानुसार आर्थिक मदत द्या, घरे पडलेल्यांना वा घरातील साहित्य नासधूस झालेल्यांना आर्थिक मदतीसह तातडीने विनाअट शासनाच्या योजनांतून घरकुले, गुरांचे गोठे व पशुहानी झालेल्यांना दुभती जनावरे द्या.
गत खरिप हंगाम – २०२४ या कालावधीतील शेतकऱ्यांना पीकविम्याची ७५% रक्कम द्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा, शेळगांव – दुगांव रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करुन अतिवृष्टीत खचलेल्या या रस्त्यावरील पुलाची तातडीने दुरुस्ती करुन सदरचे काम दर्जाहिन व संथगतीने करणारे कंत्राटदाराचे नांव, संस्था काळ्या यादीत टाकून त्यांची निकाली देयके शासनखाती वसुलीसह रद्द करुन संबंधित कंत्राटदार, शाखा, उप व कार्यकारी अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, औराळा येथिल स्मशानभूमी शेड बांधकाम, सुशोभीकरण त्यासाठीचा पांदनरस्ता काम तातडीने पूर्ण करा, अतिवृष्टीत मांजरम येथिल पाझर तलाव दर्जाहिन कामामूळे फुटल्याने संबंधित कंत्राटदारांकडून खर्चित रक्कम शासनखाती वसूल करुन त्यांचे नांव.
संस्था काळ्या यादीत टाका आणि त्यांच्यासह संबंधित अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा या तलावालगतच्या नुकसानग्रस्त, खरडलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या, बळेगांव बंधारा व गोदावरी नदीपात्राच्या बॅकवाॅटरमूळे त्रस्त पाटोदा (त.ब.), वजीरगांव, बरबडा आदी गांवातील शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाने ताब्यात घेऊन त्यांना बाजारमूल्यानुसार आर्थिक मावेजा द्या, कुंचेली जूने गांव, नरसी, नायगांव (बा.) व अन्य गांवात अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या, कोकलेगांवच्या अर्धवट पुल, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा.
अतिवृष्टीग्रस्त छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार यांना आर्थिक मदत द्या आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, तालुका उपाध्यक्ष बालाजी कदम कुंटूरकर, शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण, सय्यद जब्बार, विनायक बकवाड आदींच्या नेतृत्वात आज धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सुजलेगांवचे सरपंच दत्ता आईलवार, कहाळाचे माजी सरपंच विजय पा.कारताळे, मालू झगडे, संजय नेरलेवाड, माजी सरपंच बालाजी धुमाळ, व्यंकट गोपुलवाड, नारायण पांचाळ, प्रकाश सोनलकर, संदेश वाघमारे, देविदास वडजे, रावसाहेब वाघमारे, श्रीराम वडजे, धिरज बोयाळ, गजानन विभूते आदींसह तालुक्यातील शेतकरी व अतिवृष्टीग्रस्तांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला.
अंगणवाडी व शाळांवर लक्ष हवे…
या अतिवृष्टीत कहाळा (खु.) सह बहुतांश गांवातील अंगणवाडी व शाळेत पाणी साचल्याने पोषण आहार व शैक्षणिक साहित्याची नासधूस झाली. त्याकडे आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले.
…तर तहसील कचेरीसमोर अंत्यविधी !
सर्वसमाजासाठीच्या एकमेव स्मशानभूमीला शेड नाही व लगतचा पांदनरस्ता अतिवृष्टीने खराब झाल्याने विनंतीनंतर प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याने त्रस्त औराळकरांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून प्रशासनाने लक्ष न दिल्यास भविष्यात येथिल एखाद्या मयत व्यक्तीचा अंत्यविधीच तहसील कचेरीसमोर करु अशी भूमिका यावेळी तहसीलदारासमोर मांडली.



