नरसी चौकातील चार तासाच्या वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल : रामतीर्थ पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे मनस्ताप

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : तालुक्यातील नरसी चौकात रविवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्यावर नव्हता. विविध वाहणात व बसमध्ये अडकून पडलेल्या चिमुकल्यासह अबालवृद्धांचे हाल झाले तर लग्नासाठी निघालेल्यांची उकाड्याने आणि उन्हाच्या चटक्याने प्रचंड गैरसोय झाली. लवकर वाहतूक सुरळीत होत नसल्याने चौकात अडकलेल्या प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

रविवारी सर्वात मोठी लग्नाची तिथे असल्याने लग्नाला जाण्यासाठी सकाळपासूनच घाई होती. नागरिक स्वतःच्या वाहणासह मिळेल त्या वाहणाने आपापल्या नातेवाईकांच्या लग्नाला निघाले पण नरसी चौकात सकाळी १० वाजताच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली. पाहता पाहता नायगाव, मुखेड, बिलोली व देगलूर रोडवर तब्बल पाच कि. मी. वाहणांच्या रांगा लागल्या. नरसी चौकात आडव्या उभ्या वाहणाने कोंडी केली होती पण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचा एकही अधिकारीकिंवा कर्मचारी नरसीच्या चौकात नव्हता.

वास्तविक रविवारी मोठी लग्नतिथी असल्याने नरसी चौकातून प्रचंड वाहतूक असते त्यासाठी बंदोबस्त ठेवणे आवश्यक असताना तो न ठेवल्याने वाहतुकीची कोंडी तीन तासानंतर सुटली. एकिकडे नातेवाईकांच्या लग्नाला निघाले नागरिक वाहतूक कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न करत होते तर कोंडीत अडकलेल्या बसेस व विविध वाहणात प्रवासी होते. परंतु उन्हाच्या चटक्याने बससह विविध वाहणात बसलेल्या प्रवाश्यांची उन्हाच्या चटक्याने तगमग झालेली दिसून आली. अनेक प्रवासी वाहणातून उतरुन सावली शोधत होते.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचा कारभार तसा नरसीच्या चौकीतूनच चालतो ठाणेदार रामतीर्थचे असलेले तरी सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हाराळे हे नरसीलाच मुक्कामी असतात. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली असताना चौकात दिसले नाहीत. पोलीस कर्मचारी नसल्याने नागरिकच वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसले.
रविवारी ऐन मुहूर्ताच्या वेळीच वाहतूक कोंडी झाल्याने वाहन धारकांनी संताप व्यक्त केलाय. नरसीचा हा रस्ता तेलंगणा अन कर्नाटक राज्याला जोडणारा आहे. त्यामुळे इथे नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पोलिसांकडून इथल्या वाहतुकीचे नियोजन केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
नरसी बिटचे जमादार हे नरसीतच असतात पण दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतांना ते करतात काय असा प्रश्न विचारला जात आहे.
आमदारांची एक तास कोंडी…
विवाहासाठी निघालेले आमदार राजेश पवार यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला असून. ते नरसी चौकातील वाहतूक कोंडीत एक तास अडकले. यावेळी त्यांनी रामतीर्थ पोलीसांच्या ढिसाळ नियोजनाबद्दल संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी धावपळ करुन आ.पवार यांची वाहतुकीतून सुटका केली.
नायगाव पोलीस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांत गौडा यांच्याकडे आहे. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने वाहतूक कोंडी होणार आहे हे माहीत असल्याने ते नियमितपणे सकाळी व संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहजत पण रामतीर्थ पोलिसांना ही का जमत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.



