गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

बरबडा अंतरगावचा संपर्क तुटला तर राहेरच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद ; पाण्यात अडकलेल्या दोघांना पोलिसांनी वाचवले

अंकुशकुमार देगावकर

नायगाव :- तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी मन्याड व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नरसी व बरबडा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बरबडा अंतरगाव रस्त्यावर पाणी आल्याने तर राहेरच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली आहे.

आँगष्ट महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक सावरलेले नसताना मागच्या दोन तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून हतबल झालेले शेतकरी या पावसाच्या हैदोसामुळे कोलमडून गेले आहेत. होणारी अतिवृष्टी ही शेतकरी आणि अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारा आहे. आँगष्ट महिण्यातील ४२ हजार हेक्टरवरील नुकसानीची अद्याप मदत पदरात पडलेली नसतांना दुसऱ्यांदा नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून. जुने व नवीन कार्ल्याचाही संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर कहाळा बु. व कहाळा खु. या दोन गावच्या मधून वाहणाऱ्या नदीला पुर आल्याने नागरिकांच्या घरादारात पाणीच पाणी झाले आहे. या परिस्थितीचे तहसीलदार सौ. धम्मप्रीया गायकवाड यांनी पाहणी केली. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या बँक वाटरचा अंतरगाव, परडवाडी सह अन्य गावांना धोका निर्माण झाला आहे.

गोदावरी नदीच्या बँक वाटरचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने बरबडा अंतरगावचा संपर्क तुटला आहे तर गोदावरी नदीचे पाणी राहेरच्या पुलावरून जात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कालपासून मन्याड नदीचे पाणी रातोळी व अटकळीच्या पुलावरून जात असल्याने आजही मुखेड व देगलूरची वाहतूक बंद आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी ढगाळ वातावरण असून पावसाचा धोका टळला नाही. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन सतर्क आहे.

मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड -देगलूर दरम्यान टाकळी जवळ रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कालपासून वाहतूक बंद आहे आज सकाळी एक पिकअप घेऊन जात असताना दोन व्यक्ती आणि पिकअप सदर पाण्यात अडकले ही माहिती मिळतात पोलीस स्टेशन रामतीर्थ चे सपोनी विक्रम हराळे, त्यांची टीम घटनास्थळी पोहोचून सदर गावकरी यांच्या मदतीने नारायण बारवाल वय वर्ष 42 बदनापूर जिल्हा जालना व गोविंद बारवाल वय वर्ष 18 बदनापूर जिल्हा जालना यांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker