ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अबब….पाटोद्याच्या तलाठी, ग्रामसेवकाने चक्क पैसे घेऊन कामे केली..???

व्हाट्सअप ग्रुपमधल्या "त्या" चर्चेला उधाण

भगवान शेवाळे

नायगाव : शासकीय यंत्रणा ही जनतेची सेवा करण्यासाठी असली, तरी प्रत्यक्षात ती “सेवा” नव्हे तर “सुविधा” देण्यासाठी पैसे घेते, अशी भावना आता जनतेत निर्माण होत आहे. महसूल आणि पंचायत विभागाशी संबंधित कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याचे आरोप आता थेट सोशल मीडियावर खुलेपणाने केले जाऊ लागले आहेत.

नायगाव तालुक्यातल्या पाटोदा येथील एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये एका सुशिक्षित तरुणाने तलाठी व ग्रामसेवकांवर पैशांची मागणी केल्याचे थेट आरोप केले आहेत. यामुळे या चर्चेला उधाण आले असून, स्थानिक लोक आता थेट “सेवेच्या बदल्यात पैसा का?” असा संतप्त प्रश्न विचारू लागले आहेत. जनसामान्यांच्या मनात बराच काळ दडलेली प्रशासना विरोधातली ही खदखद आता थेट सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसून येत आहे.

गावातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शुक्रवारी सायंकाळी खरडून गेलेल्या जमिनी विषयी चर्चा सुरू होती.मात्र या चर्चेनंतर थेट गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर “पैसे घेऊन कामे केल्याचा आरोप” केल्याचं दिसून आलं आहे.

सातबाराला बोरवेल लावण्यासाठी सध्या याठिकाणी कार्यरत असलेल्या तलाठ्यांनी दोन हजार, तसेच वडिलांची जमीन दोघा भावांच्या नावावर लावण्यासाठी याआधीच्या तलाठ्यांनी जे आता बरबड्यात कार्यरत आहेत त्यांनी दहा हजार रुपये घेतल्याचे आरोप गावातील एका तरुणाने केले आहेत. शिवाय मॅरेज सर्टिफिकेट काढताना गावातील ग्रामसेवक सुद्धा पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाही असे आरोपही यावेळी करण्यात आले आहेत.

ही केवळ एका गावाची गोष्ट नाही, तर आज प्रत्येक जवळजवळ प्रत्येक गावाचीच हकीकत आहे. लोक शांतपणे सहन करतात पण मनात असंतोष साचतोय. शासनाची प्रत्येक योजना लोकांसाठी असते पण प्रत्यक्षात ती काहींच्या खिशासाठी बनते का..? ग्रामपातळीवर सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी हे शासनाचे शेवटचे हात मानले जातात. पण हे हात मदतीसाठी पुढे येतात की पैशासाठी..? असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker