ताज्या बातम्यानांदेडनायगांव

खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करण्याची मागणी…

भगवान शेवाळे

नायगाव : सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसाने नायगाव तालुक्यातील बरबडा–पाटोदा परिसरात हाहाकार माजवला होता. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने या भागातील शेकडो हेक्टर शेतीक्षेत्र झपाट्याने गिळंकृत केले. केवळ पिकांचेच नव्हे तर जमिनीचेही अस्तित्व पाण्याच्या प्रवाहात खरडून गेले. अशा नुकसानीची अचूक नोंद घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांची मोहीम सध्या सुरू आहे. परंतु, हे पंचनामे अचूक करण्याची मागणी पाटोदा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

पाटोदा येथील ममन्याळ भागातील नाल्या शेजारील गट नंबर 18 मधील अनेकांची जमीन खरडून गेल्यावर देखील याठिकाणी कागदोपत्री कमी दाखवली जात असून, यासंबधी वरिष्ठांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बरबडा येथील खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यासाठीचा आढावा घेताना येथील कृषी कर्मचाऱ्याने सांगितले की, “वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सध्या फक्त नाले आणि ओहोळ शेजारील शेतांचेच पंचनामे करण्याचे निर्देश आहेत. गोदावरी नदीलगतच्या मोठ्या शेतजमिनींसाठी अद्याप आम्हाला कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत

गावे 89 आणि 10 महसूल सहायकावरच ताण…
नायगाव तालुक्यात काही उजाड क्षेत्र समाविष्ट करून एकूण 89 गावे आहेत. त्यापैकी केवळ 10 महसूल सहाय्यक कर्मचारी हे ग्राउंड लेव्हलवर काम करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या, पीक पाहणी, नैसर्गिक आपत्तींचे पंचनामे, सरकारी योजना राबविणे या सर्व जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण या कर्मचाऱ्यांवर येत असल्याचे चित्र आहे.

नायगाव तालुक्यात दोन मंडळ कृषी कार्यालय असणे आवश्यक असताना एकच मंडळावर हा कारभार हाकला जातो. 40 गावे समाविष्ट करून एक कृषी मंडळ असणे आवश्यक आहे मात्र गावांची संख्या 90 च्या आसपास आहे आणि केवळ एकच कृषी मंडळ कार्यालय आहे. आणि त्यातही केवळ 10 कर्मचारी हे काम पाहतात. अशा अपुऱ्या कर्मचाऱ्यावर हा ताण येऊन पडतो. शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट संबंधित या विभागाकडे शासनाचा ढिसाळपणा स्पष्टपणे दिसतो.

नायगावसारख्या विस्तीर्ण आणि कृषीप्रधान तालुक्यात अधिक मंडळांची स्थापना व मनुष्यबळ वाढविणे तातडीची गरज बनली आहे. अन्यथा शासकीय योजनांचा लाभ केवळ कागदापुरताच राहणार अशी स्थिती कायम राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker