महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मागच्या काही दिवसापासून वाळू माफीयांनी नायगाव व उमरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोदापात्रातुन वाळूचा अवैध उपसा सुरु केला होता. वाळू माफीयावर पाळत ठेवून बुधवारी दि. ५ रोजी पहाटे नायगाव व उमरी महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी बरबडा अंतरगाव परिसरात पकडल्या. पकडलेल्या बोटी काही वेळानंतर स्फोटके लावून उडवण्यात आल्या. संयुक्त कारवाईत महसूल विभागाने माफीयांना जोरदार दणका दिला आहे.

दिवाळी आणि अधिकारी सुट्टीवर असल्याचा फायदा माफीयांनी घेण्यास सुरुवात केली होती. नायगाव तालुक्यातील बरबडा व अंतरगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून मागच्या काही दिवसापासून बोटीच्या सहाय्याने दिवसरात्र वाळूच अवैध उपसा करण्यात येत होता. परंतु नायगाव तहसीलदार मागे लागल्या की उमरीच्या हद्दीत पळून जायचे आणि उमरीवाले मागे लागले की नायगावच्या हद्दीत येत होते. त्यामुळे या वाळू माफीयावर कारवाई करतांना मर्यादा येत होत्या. मात्र मंगळवारी रात्री वाळु उपसा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यामुळे उमरी व नायगाव महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे नियोजन केले.

बुधवारी दि. ५ रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान धर्माबाद उपविभागीय अधिकारी दाभाडे, बिलोली उपविभागीय अधिकारी सौ.क्रांती डोंबे, उमरी व नायगाव तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड, सोबतच कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले, मंडळ अधिकारी आरु मंडळ अधिकारी बरवाडा कावळे तलाठी हसनपल्ले, शुभम पाटील, मोटे, मदेवाड चालक तुकाराम पुरी अदिंनी बरबडा अंतरगाव भागातील गोदावरी नदीपात्रात दोन्ही बाजूनी एकाच वेळी कारवाई सुरु केली.

या संयुक्त कारवाईत दोन फायबर बोटी आढळून आल्या या बोटीच्या सहायाने वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. या दोन्ही बोटी जप्त करण्यात आल्या व स्फोटक लावून नष्ट करण्यात आल्या. महसूल विभागाने पहील्यांदाच एकदुसऱ्यात ताळमेळ ठेवून ही कारवाई केल्याने माफीयांना चांगलाच दणका बसला आहे. मात्र अशा कारवाया सातत्याने झाल्या पाहीजेत अशी मागणी होत आहे.
चार महिला अधिकाऱ्यांनी केली कारवाई …
नायगाव तालुक्यातील बरबडा अंतरगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात उतरून धर्माबाद उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, बिलोली उपविभागीय अधिकारी सौ.क्रांती डोंबे, उमरी तहसीलदार सौ.मंजुषा भगत व नायगाव तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड या चार महिला अधिकाऱ्यांनी अतिशय धाडसाने कारवाई करुन माफीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला. या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.



