“बरबडा सर्कलचा राजकीय पट तापला..! मोरेंच्या भाजप प्रवेशानंतर आमदारपत्नीचेही लागले बॅनर, राष्ट्रवादीत धर्माधिकारी – सुगावेंची शर्यत…”
"काँग्रेस 'प्रामाणिक चेहऱ्या' ला बळ देईल".?? बरबडा सर्कल जिल्हा परिषद निवडणूक रणसंग्राम..!!

भगवान शेवाळे
बरबडा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून,पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची चिन्हं स्पष्ट असून,राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचालींना उधाण आलं आहे.नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कलसह परिसरातील गावांमध्ये पक्षनिहाय बैठका, संभाव्य उमेदवारांच्या गाठीभेटी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. प्रत्येक गावात ‘कोण उतरतोय?’ आणि ‘कोणाचा दावा मजबूत?’ या चर्चांनी चावडीवरच्या गप्पा आता रंगताना दिसून येत आहेत.
नायगाव तालुक्यात केवळ बरबडा गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने या गटाकडे सर्वांच्या नजरा आहेत.महत्वाचं म्हणजे हा भाग ज्या विधानसभा मतदारसंघात येतो त्या भागाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या अर्धांगिनी याच गटातून इच्छुक असल्याचे समोर आलेल आहे. मागील आठ दिवसापूर्वी भावी जिल्हा परिषद सदस्य या नावाने आमदार पत्नी सौ.पूनमताई पवार यांच्या नावाचे बॅनर गावोगावी लागलेले आहेत. विशेष बाब, असेच बॅनर धर्माबाद तालुक्यातील करखेली या गटामध्ये देखील लागले काही दिवसापूर्वी लागले असल्याने आमदार पत्नी नेमक्या कोणत्या गटातून निवडणूक लढवतील..? हा संभ्रम सध्या जनतेसमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील भाजप नेते माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू असलेले याच भागातील कंत्राटदार मनोज पाटील मोरे हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रवेशानंतर बरबडा गटातून ते मुख्य दावेदार असतील असे वाटत असताना त्यांच्या प्रवेशानंतर अगदी दोनच दिवसांनी आमदार राजेश पवार यांच्या पत्नी सौ.पूनमताई पवार यांच्या भावी जिल्हा परिषद सदस्या नावाचे फलक गावोगावी झळकले.त्यामुळे मनोज पाटील मोरे यांचे काय..?? असा प्रश्न निर्माण होत असतानाच दोन दिवसापासून मनोज पाटील मोरे हे देखील ॲक्टिव मोड मध्ये आले आहेत.
गावोगावी त्यांनीही भेटी सुरू केल्या असून, गुरुवारी त्यांनी सर्कलमध्ये अनेक राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी घेतल्या आहेत. शिवाय शुक्रवारी त्यांनी त्यांच्या टाकळी (त.ब.) येथून सर्व गावकऱ्यांच्या समक्ष पक्षाने संधी दिली तर संधीचं सोनं करू असा एल्गारही पुकारला असल्याच्या पोस्ट सोशल मीडियातून झळकत आहेत..मात्र बरबडा गटात भाजपकडून अंतिम चेहरा कुणाचा.?? हा प्रश्न अजून तरी संदिग्धच म्हणावा लागेल.परंतु,आमदार पत्नी सौ.पुनमताई पवार यांनी जर या गटातून थेट निवडणूक लढवून जिंकली,तर जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील माजी जिल्हाध्यक्ष,अजित पवार गट वेगळा झाल्यावर पहिल्यांदा नांदेडचे जिल्हाध्यक्ष झालेले तसेच जिल्ह्यातील पक्ष विस्ताराची मोठी जबाबदारी पार पाडलेले दिलीपराव धर्माधिकारी यांनी देखील या गटात जोरदार तयारी सुरू केली आहे.गावागावातील लोकांसोबत चर्चा, संवाद बैठका यावर त्यांनी मोठा भर दिला आहे.याच पक्षातील प्रदेश सरचिटणीस घुंगराळा येथील उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांच्यासह त्यांची संपूर्ण यंत्रणा मात्र जोरदार तयारी करताना दिसत आहे. गावागावातील लोकांसोबत ते दररोज बैठकावर भर देत आहेत. गटातील गावातल्या प्रतिष्ठित लोकांसोबत सुगावे पाटील संपर्क वाढवल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष नेमका या दोघांपैकी कोणाचा विचार करेल..?? हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
काँग्रेस “प्रामाणिक चेहऱ्याला” बळ देईल…??
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते भास्करराव धर्माधिकारी यांनीही या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रेसमध्ये उतरण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे.दोन हात आणि मस्तक घेऊन मी जनतेपुढे जाणार असल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या परंतु पदापासून कायमच दूर राहिलेल्या या पुरोगामी विचाराच्या प्रामाणिक चेहऱ्याला काँग्रेस आता तरी बळ देईल..? का अजून कोणता पर्याय त्यांच्यापुढे निर्माण करेल..? हे काही दिवसानंतर स्पष्ट होईलच.
परंतु संपूर्ण जिल्ह्यात विविध गटात सुरू असलेल्या या राजकीय हालचाली आता फक्त सत्तेच्या समीकरणापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत; तर स्थानिक नेतृत्व, जनाधार आणि संघटनशक्ती यांच्या थेट चाचणीचं मैदान बनल्या आहेत. त्यामुळे बरबडा सर्कलसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.



