कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ◆ मतदान अधिकारी व कर्मचारी निवडणूक साहित्यासह मतदान केंद्रावर दाखल
◆ निवडणूक निर्णय अधिकारी विपिन पाटील व सहायक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर,सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांची माहिती ◆मंगळवार चा आठवडी बाजार रद्द, गुरुवारी भरणार बाजार

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दि.२ डिसेंबर रोजी मतदान व दि.३ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीसाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मतदानासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून २२ केंद्राध्यक्ष व ८१ कर्मचाऱ्यांसह क्षेत्रीय अधिका-यांची नियुक्ती मतदान प्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी करण्यात आली आहे. १३ पोलीस अधिकाऱ्यांसह १९५ पोलीस कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विपिन पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर व कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून यासाठी शहरात १८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. शहरात एकूण १२ हजार १६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दि.३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून के.रामलू मंगल कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.हि सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे.
◆मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…
कुंडलवाडी नगरपरिषदेची निवडणूकीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मंगळवारी होणार आहे. तसेच दि.३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व व्यवस्था अबाधित व्हावी व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात दि.२ डिसेंबर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करून दि.४ डिसेंबर रोजी गुरुवारी आठवडी बाजार भरविण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.



