अन् दिलीपराव धर्माधिकारी यांचा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान प्रवास घडला..!!

बरबडा : भगवान शेवाळे
“पद, प्रतिष्ठा असली तरी कार्यकर्त्यांशी अजितदादा पवार कायम माणूसकीने वागतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचा नुकताच झालेला नांदेड दौरा!”
पक्षीय भेट तसेच विविध विषयावर चर्चा करण्यासाठी नांदेड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले असता अजित दादा पवार हे नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सांत्वनपर भेटीसाठी निघाले होते. यादरम्यान भेटीसाठी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेले दिलीपराव धर्माधिकारी यांना नावानिशी बोलवून “चला दिलीपराव नांदेडला जाऊ आपण” म्हणत विमान प्रवासाचे निमंत्रण दिले.
त्यामुळे अचानक आलेल्या या निमंत्रणाने आणि थेट अजितदादासोबत विमान प्रवास घडणार या भावनेने दिलीपराव धर्माधिकारी हे भारावून गेले. नांदेड विमानतळावर उतरताच त्यांनी या खास प्रवासादरम्यान नांदेडच्या राजकीय घडामोडी, विकासकामे आणि संघटनात्मक घडामोडींवर विस्तृत चर्चा झाल्याची माहिती दिली. त्यामुळे योगायोगाने घडलेला धर्माधिकारी यांचा विमान प्रवास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरवणारा ठरला आहे.
अजितदादा पवार कार्यकर्त्यांशी त्यांच्या मनापासून जोडलेले असतात. ते पदावर असतानाही साधेपणाने संवाद साधतात आणि जुन्या कार्यकर्त्यांशी तितक्याच आपुलकीने भेटतात. या प्रवासामुळे उपमुख्यमंत्री अजितदादांचा हा साधेपणा आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



