ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रामपूरचा हायप्रोफाईल जुगार अड्डा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली ?

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी अगोदर रामपूरच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्याला मुक समंती दिली. नंतर बोभाटा होताच कारवाई केली पण केलेली कारवाई दडपण्याचा प्रयत्न केला. याबाबत न्यु भारत टाईम्सने पोलखोल करताच रामतीर्थच्या ठाणेदाराचे पितळ उघडे पडले. आता रामपूरचा हाय प्रोफाइल जुगार अड्डा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

मागच्या काही महिण्यापासून रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चर्चेचा विषय बनले असून दोन महिण्यापुर्वी जुगाराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर अर्थिक तडजोडीच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छाप मारत सेवानिवृत्तीच्या जवळ आलेल्या अधिकाऱ्यास अटक केली होती. वास्तविक या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार हे ठाणे प्रमुखच असल्याची त्यावेळी चर्चा झाली.

परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रमुख विक्रम हराळे यांना तडकाफडकी मुख्यालयात हजर केले. मात्र पंधरा ते विस दिवसानंतर पुन्हा त्यांना रामतीर्थ ठाणे बहाल करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दूसऱ्यांदा पदभार घेतल्यानंतर नव्या जोमाने परिसरात अवैध धंदे सुरु झाले. यात रामपूर येथील हाय प्रोफाइल जुगार अड्ड्याचाही समावेश होता.
रामपूरच्या जुगार अड्ड्याचा बोभाटा झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली.

यावेळी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे बदक छाप पत्ते तसेच ५ हजार ५५० रुपये रोख असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. तर शंकर बाबु निलमवार (वय ३५, रा. पाचपिंपळी, ता.बिलोली), चंद्रकांत ज्ञानोबा शेळके (वय ३२, रा. पाचपिंपळी, ता.बिलोली), योगेश अशोक रामपुरे (वय २८, रा. पाचपिंपळी, ता.बिलोली), विठ्ठल मारोती इंगळे (वय ३५, रा. आदमपुर, ता.बिलोली), नितीन मारोती गजभारे (वय ३२, रा. कुंटुर, ता.नायगाव) यांच्यावर जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचाच या जुगार अड्ड्याला पाठींबा असल्याने त्यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांना माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने अनेक वेळा फोन केला पण मला साहेबांना विचारावे लागते असे कारण देवून महिती देण्याचे टाळले.

याबाबत न्यु भारत टाईम्सने ठाणेदाराची पोलखोल केल्यानंतर जुगार अड्ड्यावर मोठ्या शिताफीने कारवाई करत आरोपींना अटक केल्याच्या बातम्या प्रकाशित करुन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु जो मेसेज जायचा होता तो गेल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्याची चांगलीच बदनामी झाली.

रामतीर्थ पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्यानंतर रामपूर येथील जुगार अड्डा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker