नायगाव तालुक्यात जत्रा तेथे गुडगूडी : यात्रेच्या नावाखाली नागरिकांना लुटण्याचा उद्योग

प्रकाश महिपाळे
नायगाव : नायगावसह कुंटर व रामतीर्थ पोलीस ठाण्यातच्या हद्दीत परंपरेचा भाग असलेल्या विविध देवतांच्या यात्रा भरण्यास सुरुवात झाली असून. दुसरीकडे जत्रा तेथे गुडगूडी सुरु करुन यात्रेला येणाऱ्यांची खिसे रिकामे करत नागरिकांना लुटण्याचा उद्योग सुरु झाला आहे. गुडगूडी सारखा जुगार चालवणाऱ्यांनी पोलीसांचे हात मजबूत करुन नागरिकांना लुटत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नायगांव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या विविध देव-देवतांच्या नावाने जत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. परंपरेचा भाग म्हणून भरवण्यात येणाऱ्या या जत्रा आता काही ठिकाणी गैरप्रकारांचे केंद्र बनत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः गुडगुडी नावाचा (जुगार) खेळाच्या माध्यमातून नवयुवकांना व नागरिकांना वेड लावून त्यांच्या खिशातील पैसे रिकामे करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. नुकतेच कुंटूर ठाण्याच्या हद्दीत एका गावात यात्रा संपन्न झाली या ठिकाणी गुडीगुडी जोरदार पणे सुरु होती.
गेल्या कित्येक वर्षापासून अनेक गावात यात्रा भरत असते गेल्या दोन-तीन वर्षापासून तालुक्यातील गावात भरणाऱ्या कुंटूर, रामतीर्थ व नायगाव पोलिसांचे अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे, बाहेरून आलेले चालक व दलाल यामध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला किरकोळ रकमेपासून खेळ सुरू करून युवकांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवले जाते. अनेक तरुण, नागरिक या जुगाराच्या नादात कर्जबाजारी होत असून काहींनी घरातील दागिने व मौल्यवान वस्तू गहाण ठेवल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. या गंभीर प्रकारांकडे संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे, ज्या गावात जत्रा भरते त्या ठिकाणचे पोलीस ठाण्याचे संबंधित ठाणे प्रमुखांच्या “आशीर्वादाने” च हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा तालुक्यात उघडपणे होत आहे. जत्रा सुरू असताना पोलिसांचा बंदोबस्त केवळ नावापुरता असून गुडगुडीचे फड मात्र निर्धास्तपणे चालू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
या प्रकारामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून, युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “देवाच्या नावावर भरवली जाणारी जत्रा जर समाजाला अधोगतीकडे नेत असेल, तर अशा यात्रांना परवानगीच का दिली जाते?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.



