गडगा गावात विजेचा खेळ खंडोबा ; अर्धा गाव बुडाला अंधारात

New Bharat Times नेटवर्क
नायगाव: नायगाव तालुक्यातील गडगा येथील सिंगल फेजच्या एक दोन नव्हे तर तब्बल दहा डीपी जळाल्याने अर्धा गाव गुरूवारी तारीख ८ जानेवारी रोजी अंधारात बुडाला आहे. दहा डीपी जळाल्याने गावात विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. वीज बील वसुलीत समाधानकारक कामगिरी असलेले गाव विजपुरवठा सेवेसाठी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

गडगा गावातील तेली डीपी, महादेव डीपी, जिल्हा परिषद शाळा डीपी तसेच मांजरम रस्ता परीसर डीपी याठिकाणच्या एकूण १० सिंगल फेज डीपी जळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. डीपी जळाल्याने गावात आतापर्यंत कमी दाबाने वीजपुरवठा सुरू होता. त्यातच एकाच वेळी सर्व दहा डीपी जळाल्याने अर्धा गाव अंधारात बुडाला आहे.
वीज पुरवठ्याचे स्वीच बाॅक्स, केबल, कीटकॅट ची दयनीय अवस्था झाली आहे त्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर असलेले जुने लोखंडी खांब जीर्ण झाल्याने ते कधी कोसळतील याचा नेम नाही. ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या डीपीचे स्वीचबाॅक्सची उंची जमीनीपासून अगदी तीन फुटांवर असल्याने येथे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच ठिकाणी अंगणवाडी क्रमांक चार भरवली जाते. त्यामुळे धोका अधिक आहे.
गडगा-कंधार रस्त्यावर गावालगत रस्ता क्रॉस करून गेलेल्या वीज वाहीनीच्या तारांना ऊस वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर लागत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ही समस्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील आश्वासनाशिवाय कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनीच वीज वाहीनीच्या तारांना लाकडाच्या सहाय्याने टेकू देवून तात्पुरता उपाय केला असला तरी तो तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून धोकादायक ठरू शकतो याकडे देखील कंपनीने दुर्लक्षित केले आहे.



