ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग : 20 फेब्रुवारी पासून सुरु होणार प्रभाग रचनेचे काम

प्रकाश महिपाळे
नायगाव : मुदत संपलेल्या नायगाव तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला दि. 20 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली असून आज बुधवारी या समितीची पहीली बैठक होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
नायगाव तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने काढले होते. त्यानंतर सरपंचात नाराजीचा सुर उमटला तर संघटनेने प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर दि. 17 फेब्रुवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभाने एक आदेश काढला आहे. त्यानुसार दि. 20 फेब्रुवारी पासून मुदत संपणा-या ग्रामपंचायती असुन तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम तयार करण्याचा कार्यक्रम सुरु करण्या बाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.
आदेशानुसार तहसीलदार नायगाव यांनी दि. 17 रोजीच एक पत्र काढले असून प्रभाग रचना तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष स्वतः तहसीलदार आहेत तर सदस्य सचिव म्हणून गटविकास अधिकारी आहेत तर नायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर, बरबडा मंडळ अधिकारी, सर्व तलाठी आणि सर्व ग्रामपंचायत अधिकारी हे सदस्य असून.
सदर समितीला दि. 20/02/2026 ते 30/03/2026 रोजी पर्यत प्रत्येक गावाचे गुगल अर्थचे नकाशे, सुपर इंम्पोज करून, अतिंम करणे, प्रभाग पाडणे, सिमा निश्चीत करून स्वाक्षरीने अहवाल तहसीलदार नायगांव (खै.) तथा अध्यक्ष यांना सादर करण्याचे काम करायचे आहे.
नायगाव तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे काम दि. 20 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचे आदेश असल्याने तालुकास्तरीय समितीची बैठक आज दि. 18 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
● प्रभाग रचना दि. 20 फेब्रुवारीला सुरु करुन दि. 30 मार्च रोजी तालुकास्तरावर पुर्ण करण्यात येणार आहे.
● दि. 7 ते 23 एप्रिल दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागवणे, आलेल्या हरकती व सुचना उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठवणे, सुनावणी घेणे आणि अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवण्यात येणार आहे.
● दि. 28 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडून प्राप्त प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करुन निवडणूक आयोगाकडे सादर करतील.
● दि. 4 मे रोजी निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिध्द देणे.



