चिटमोगरा शिवारात हरभऱ्याच्या गंजीला आग दोन एकरांतील पीक जळून खाक

शेषेराव कंधारे
नायगाव :- चिटमोगरा शिवारात शेतकरी त्र्यंबक मलबा देवाले यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. २१ फेब्रुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे दोन एकरांतील हरभऱ्याचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबक देवाले यांनी दिवसभर उन्हात पत्नीसमवेत कष्ट करून हरभऱ्याची कापणी केली होती. काढणी केलेला हरभरा शेतातच गंजी करून ठेवण्यात आला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने हरभऱ्याच्या ढिगाला आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शेजारील शेतकरी अहमद साहेब शेख यांच्या निदर्शनास आग लागल्याची बाब येताच त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांना पाचारण केले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. परिणामी संपूर्ण हरभऱ्याची गंजी जळून खाक झाली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सूडबुद्धीने आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



