ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

विद्रोही साहित्यिकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज

२७, २८ फेब्रुवारी व ०१ मार्च रोजी होणार २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांची माहिती

जयवर्धन भोसीकर

नांदेड : विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित व संविधान मूल्यांना समर्पित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून २७, २८ फेब्रुवारी व ०१ मार्च रोजी होणाऱ्या या संमेलनासाठी सायन्स कॉलेजच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुलाच्या मैदानावर उभारण्यात आलेली साहित्य नगरी विद्रोही साहित्यिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष राहुल एस. एम. प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस डॉ.राजेंद्र गोणारकर , डॉ.अनंत राऊत , प्रा. विठ्ठल भंडारे , इंजि.भीमराव हाटकर , राज गोडबोले , इंजि. भारत कानिंदे, विठ्ठल असूरे , कॉ.उज्वला पडलवार , डॉ. विजयकुमार माहुरे आदींची उपस्थिती होती. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड झाली असून उद्घाटक म्हणून हिंदीतील ख्यातनाम समीक्षक डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंद आव्हाड (दिल्ली) यांची उपस्थिती लाभणार आहे.

इंजि.चंद्रशेखर शिखरे, डॉ.रेखा शेळके आणि डॉ.प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन स्वतंत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांचे व्याख्यान होणार आहे. संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनासह तीन स्वतंत्र कवी संमेलने पार पडणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते मिलिंद शिंदे (मुंबई )यांच्याशी डॉ. राजेंद्र गोणारकर संवाद साधणार असून त्यांच्या कविताही रसिकांना ऐकावयास मिळणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रेमानंद गज्वी लिखित ‘घोटभर पाणी’ ही एकांकिका सादर होणार आहे. तसेच ‘मी जनाबाई’ आणि ‘मी सावित्रीबाई फुले’ हे एकपात्री प्रयोगही रंगणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध पत्रकार ज्ञानेश महाराव यांचे ‘शाहिरांचे गणराज्य – लोकशाहीचा सांस्कृतिक प्रवास’ हे संगीत व्याख्यान होणार आहे.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता, पॅंथर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाजात कोण’ हे नृत्यनाट्य सादर करण्यात येणार आहे. या प्रभावी कलाप्रयोगाचे दिग्दर्शन पुणे येथील दिग्दर्शक मयूर शितोळे यांनी केले आहे. विद्रोही विचारधारेची काव्यात्मक व रंगमंचीय अभिव्यक्ती असलेला हा कार्यक्रम संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

संमेलन परिसरात विविध प्रकारच्या चित्रप्रदर्शनाचे कलादालन उभारण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध प्रकाशनांच्या पन्नासहून अधिक ग्रंथदालनांचा सहभाग असणार आहे.
समारोप कार्यक्रमासाठी प्रो. रतनलाल (दिल्ली) आणि प्रियंका भारती यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या तीन दिवसीय संमेलनात महाराष्ट्रातील प्रगतिशील साहित्यिक, कवी, कलावंत तसेच पाच हजारांहून अधिक साहित्यप्रेमी सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत संमेलनाची भूमिका, कार्यक्रमांची रूपरेषा आणि जनसहभागातून उभ्या राहणाऱ्या या संमेलनाच्या वैशिष्ट्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. नांदेड नगरी विद्रोही साहित्यिकांच्या स्वागतासाठी पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker