नायगाव नगरपंचायतीचा कारभार ढिसाळ ; कचऱ्याचे ढिगारे अन नाल्यांचे पाणी रस्त्यावर!
नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका; गजानन पाटील चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :– नायगाव शहरात नगरपंचायत अस्तित्वात असूनही विकासाऐवजी केवळ समस्यांचा ‘खोळंबा’च पाहायला मिळत आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतानाही, शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. या गलथान कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, “प्रशासनाने नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे.
शहरात ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे केवळ फलक आणि घोषणाच दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अत्यंत विदारक आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, नाल्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, नाल्यांचे घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.
शहरातील भाजी मंडईची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. येथील नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचे शिंतोडे थेट विक्रेत्यांच्या भाजीपाल्यावर उडत आहेत. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गजानन पाटील चव्हाण यांनी केला आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे १५ लाख रुपयांची उचल केली जाते. कर्मचारी वेतन आणि विविध योजनांच्या नावाखाली कागदोपत्री लाखो रुपये खर्च दाखवले जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर कामाचा ठसा उमटलेला दिसत नाही. त्यामुळे हा निधी नेमका मुरतोय कुठे? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.
“शहरातील या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. केवळ कागदी कामांवर समाधान न मानता, प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे. जर स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये तात्काळ सुधारणा झाली नाही, तर जनसामान्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— गजानन पाटील चव्हाण
मुख्य रस्त्यांवर नाल्यांचे पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा, कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे अभाव, भाजी मंडईत अस्वच्छतेचे साम्राज्य, निधी खर्च होऊनही सुविधा शून्य.
आता या इशाऱ्यानंतर तरी नगरपंचायत प्रशासन झोपेतून जागे होऊन स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलणार का? याकडे संपूर्ण नायगाव शहराचे लक्ष लागले आहे.



