नायगाव तालुक्यात अंधार अन् वनवास : जनतेचे हाल, पण लोकप्रतिनिधी ‘भूमिगत’!
निवडणुकीपुरते 'छत्र्या' उगवतात, संकटात कुठे गायब होतात? जनतेचा संतप्त सवाल

प्रकाश महिपाळे
नायगाव : – एकीकडे ‘डिजिटल इंडिया’च्या गप्पा मारल्या जात असताना, नायगाव तालुक्यात मात्र सध्या भीषण वास्तव समोर येत आहे. थकीत वीज बिलापोटी गावागावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्याचे बिल न भरल्याने नागरिकांना आठ-आठ दिवस पाण्यासाठी व अंधारात वनवास सोसावा लागत आहे. एकीकडे अंधाराचे साम्राज्य असताना दुसरीकडे ‘गॅस’साठी रात्रभर जागरण करावे लागत आहे. या सर्व प्रश्नांवर जनता होरपळत असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.
विजेअभावी गावच्या गावे अंधारात
गेल्या काही दिवसांपासून महावितरणने नायगाव तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा धडाधड तोडण्यास सुरुवात केली आहे. घरगुती वीज बिल असो किंवा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे बिल, थकबाकीचे कारण पुढे करून संपूर्ण गावलाच अंधारात लोटले जात आहे. आठ-आठ दिवस वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.
एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे महावितरणचा कमालीचा निष्काळजीपणा, अशा दुहेरी संकटात सध्या ग्रामीण भागातील जनता होरपळून निघत आहे. गावागावांत २०-२५ वर्षांपूर्वी टाकलेल्या जुन्या वीजवाहिन्या, लोंबकळणाऱ्या तारा आणि वारंवार नादुरुस्त होणारे डीपी (रोहित्र) यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अनेक गावांममध्ये वीज वितरणाची यंत्रणा दोन दशकांहून अधिक जुनी आहे. या तारा इतक्या खाली आल्या आहेत की, कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. साधी देखभाल-दुरुस्ती करण्यासाठीही महावितरणचे कर्मचारी फिरकत नसल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, जे ग्राहक प्रामाणिकपणे दरमहा वीज बिल भरतात, त्यांनाच या ढिसाळ नियोजनाचा सर्वाधिक फटका बसत आहे.
‘आकडे बहादरां’मुळे इमानदार ग्राहकांना भुर्दंड
गावांमध्ये अनधिकृतपणे वीज चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येऊन डीपी जळण्याचे प्रकार घडतात. मात्र, महावितरण अशा चोरांवर कारवाई करण्याऐवजी नियमित बिल भरणारे ग्राहक आणि जनावरांच्या तोंडचे पाणी पळवत आहे. उन्हाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी वीज आवश्यक असताना, ऐन वेळी वीज खंडित होत असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढता उकाडा यामुळे लहान मुलांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वीज नसल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरते, ज्यातून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने उन्हाळ्याचे नियोजन सहा महिने आधीच कागदावर केले असले, तरी महावितरणच्या ‘गलथान’ कारभारामुळे हे नियोजन केवळ नावापुरतेच उरले आहे.
”आम्ही तक्रारी करून थकलो, पण महावितरणला जाग येत नाही,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आता या विषयात स्थानिक आमदार आणि खासदारांनी तातडीने लक्ष घालून प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे.
गॅससाठी रात्रभर जागरण ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?
गॅस सिलिंडर बुकिंग करून १५-२० दिवस उलटले, तरी ग्राहकांना गॅस मिळेनासा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कडक निर्देश दिले असतानाही, नायगाव तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गॅस एजन्सीसमोर रात्रीपासूनच रांगा लावाव्या लागत असून, महिलांना आणि वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि गॅस एजन्सींचे काय ‘साटलोटं’ आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
निवडणुकीत ‘छत्र्या’ उगवतात, मग आता कुठे गेले?
जनता जेव्हा संकटात असते, तेव्हा धावून येणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मात्र, नायगाव तालुक्यातील चित्र उलटे आहे. निवडणुकीच्या काळात गल्लोगल्ली फिरणारे आणि मतदारांच्या पाया पडणारे लोकप्रतिनिधी आता जनतेला गरज असताना चक्क ‘भूमिगत’ झाले आहेत. एरवी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात किंवा देवदर्शनाच्या नावाखाली ‘चंपूगिरी’ करण्यात मग्न असणारे हे नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत. पावसाळ्यात जशा छत्र्या अचानक उगवतात, तसे हे लोकप्रतिनिधी फक्त मतदानाच्या तोंडावर दिसतात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
जनतेचा तीव्र संताप ; आंदोलनाचा इशारा
लोकप्रतिनिधींच्या या उदासीन भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नायगाव तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. “आम्ही मतदान फक्त अंधारात राहण्यासाठी आणि गॅससाठी रांगा लावण्यासाठी करायचे का?” असा परखड सवाल विचारला जात आहे. जर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही आणि गॅस वितरण सुरळीत झाले नाही, तर तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याच्या तयारीत आहे.



