नायगावमध्ये सट्टेबाजी फोफावली ; तरुणाईला देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरु

प्रकाश महिपाळे
नायगाव : आयपीएल सुरु झाल्यापासून नायगाव तालुक्यात सट्टेबाजीला उधाण आले आहे. राजाश्रय प्राप्त काही पांढरपेशी मंडळी या सट्टाबाजारात सक्रीय झाली असून. तरुणांना देशोधडीला लावण्याचा गोरखधंदा सुरु झाला आहे. सलामीच्या सामन्यापासून सट्टेबाजांची जोरदार फिल्डिंग सुरु झाली असली तरी पोलीस यंत्रणेची मात्र मिस फिल्डींग ठळकपणे दिसून येत आहे.
भारतात दि. 28 मार्चपासून आयपीएल सुरु झाला आहे आयपीएल सुरु होण्याच्या अगोदरपासूनच सट्टेबाज सक्रिय झाले असून. त्यांनी आपापल्या जुन्या ग्राहकांना संपर्क साधत आहेत. नायगाव शहरासह तालुक्यात सट्टेबाज सक्रीय झाले असून त्यांचे नेटवर्क चांगलेच विस्तारले आहे.
त्यामुळे लहान मोठे एजंट सावज शोधण्याच्या कामाला लागले असून कमी कालावधीत जास्त पैसा कमवण्याच्या नादात तरुणाई या सट्टेबाजांच्या विळख्यात सापडून बरबाद होत आहे. मागच्या वर्षी नायगाव व रामतीर्थ पोलिसांनी एकदोन ठिकाणी कारवाया केल्या पण सट्टेबाजी मुळापासून नष्ट करण्यात आली नाही.
नायगावसह कुंटूर व रामतीर्थ पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी नसल्याने सट्टेबाजीनेला उत आला असून या सट्टेबाजीत काही पांढरपेशी मंडळी गुंतली असून. या पांढरपेशी मंडळीना राजाश्रय मिळत आहे. राजाश्रय मिळत असल्याने आमचे काहीही होत नाही या अविर्भावात आहेत. नायगाव, कुंटूर व रामतीर्थ पोलीस ठाण्यात सक्षम अधिकारी नसल्याने आणि कुणाचा पायपोस कुणाला नसल्याने सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे.
पालक चिंतेत..
आयपीएलच्या सट्टेबाजीत तरुणाई गुरफटली असून याचा विपरीत परिणाम होत आहे तर दुसरीकडे मुलानी केलेल्या उचापतीची भरपाई पालकांना करावी लागत असून. काही दिवसांपूर्वी नायगाव शहरामध्ये सट्टेबाजीत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी बरीच रक्कम द्यावी लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आयपीएल सुरु झाल्यापासून पालकांची चिंता वाढली आहे.
आय जी शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करत असले तरी फोफावलेल्या या सट्टेबाजीला मात्र आवर घालण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
राजकीय नेत्यांच्या आजुबाजुला वावरणारेच काहीजन या सट्टेबाजीचे प्रमुख आहेत. त्यामुळे कुठलीही भानगड झाल्यास त्यांना राजाश्रय मिळत आहे.
आता जिल्हा पोलीस प्रशासन या सट्टेबाजांच्या मुसक्या आवळणार की तरुणाई अशीच देशोधडीला लागणार, याकडे संपूर्ण नायगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.



