परवाने निलंबित केलेल्या पाच कृषी सेवा केंद्र चालकाकडे विविध प्रकारच्या खताचे पंधरा हजार पोते शिल्लक : शेतकऱ्यांची होणार गैरसोय

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : शहरातील ज्या सात कृषी सेवा केंद्रांचे खत विक्रीचे परवाने सहा महिण्यासाठी निलंबित करण्यात आलेत. त्यापैकी पाच कृषी सेवा केंद्र चालकाकडे विविध प्रकारच्या खताचे तब्बल 15 हजार पोते शिल्लक आहेत. पुढील सहा महिणे खत विक्री करता येणार नाही दुसरीकडे खरिप हंगाम तोंडावर आला आहे. परिणामी शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे ही खते कृषी विभागाने ताब्यात घेवून शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी होत आहे.
दर वर्षीच नायगाव शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक बियाणे किंवा खत विक्री प्रकरणात वादात अडकतात. याबाबत जोरदार बातम्याही येतात कृषी विभागाचे गुणनियंत्रण पथक व भरारी पथक येते थातुरमातुर कारवाई करुन मोकळे होते आणि शेतकरी नागवल्या जातो. परंतु सहा महिण्यापुर्वी या कृषी सेवा केंद्र चालकाच्या मुजोरीला चाप बसला असून नायगाव शहरातील सात कृषी सेवा केंद्राचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. सात पैकी पाच बडे व्यापारी असून त्यांचे परवाने रद्द करण्याचे धाडस कृषी विभागाने दाखवले.
विशेषतः हाच विषय मार्च महिन्यातील राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाला. त्यामुळे जुन्याच प्रकरणात कृषी विभागाने दुसऱ्यांदा कारवाई करुन सहा महिण्यासाठी केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, दशरथ कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र अदिचे खत विक्री परवाने निलंबित केले.
सातही कृषी सेवा केंद्राचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या शिल्लक खत साठ्याची मोजदाद कृषी विभागाने केली आहे. सात पैकी केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, दशरथ कृषी सेवा केंद्र व हनुमान कृषी सेवा केंद्र या पाच केंद्रात विविध प्रकारच्या खताचे तब्बल 14 हजार 848 पोते शिल्लक असून. पुढील सहा महिणे खत विक्री करता येणार नाही परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाने पुढाकार घेऊन हा खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे.



