महाराष्ट्रमुंबईलेख
डॉ.बाबासाहेब आंबेडकर – एक ज्वलंत धगधगणारा विचार

अँड.उमर शेख
14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण 135 वी जयंती साजरी करीत आहोत. डॉ. आंबेडकराविषयी अनेक थोर मोठे लेखक, विचारवंतानी आपआपल्या ग्रंथामध्ये त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे विचार, मत मांडलेले आहेत. कष्टकरी, दिंनदुबळे, कामगार, महिला, शोषित- वंचित इत्यादी समजातील घटकांप्रती केलेले कार्य, त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजही त्यांच्या महान विचाराने ज्वलंत धगधगत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार तर आहेच. परंतु याहीपेक्षा स्वतःची एक वेगळी विचारधारा जपणारा, शोषित वंचित घटकाचे कैवारी, अंधारात पडलेल्या समाजाला उजेडात आणून योग्य दिशा देणारा जगातला एक महान ज्ञानी माणूस अशी ओळख निर्माण करणारा महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी वाटत असे की, समाजातला शेवटचा घटक जोपर्यंत सुखी होत नाही, त्याला न्याय, हक्क भेटत नाही तोपर्यंत व्यवस्थेच्या विरोधात लढले पाहिजे, झगडले पाहिजे. कारण समाजातला प्रस्थापित वर्ग तुम्हाला डोकं वर काढू देणार नाही, त्यांच्या पेक्षा तुम्हाला वरचढ होऊ देणार नाही. म्हणून बाबासाहेब आपल्या वेगवेगळ्या भाषणातून समाजाला योग्य उपदेश द्यायचे. "शिका, संघटित व्हा! आणि संघर्ष करा! मोक्याच्या जागा काबीज करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि तो जो प्राशन करील तो गुरगुर्ल्याशिवाय राहणार नाही." हे ज्यांना कळलं ते सत्तेमध्ये, प्रशासनामध्ये खुर्ची वर जाऊन बसले. त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला. त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. ज्यांना नाही कळले ते गरीबच राहिले. त्यानंतर बाबासाहेबांचे विचार पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले. परंतु बाबासाहेब ज्ञानाचा अथांग सागर असल्यामुळे तो सागर कधी आटलाच नाही. म्हणून तर आज त्यांच्या विचारांची ज्योत कित्येक वर्षापासून ज्वलंत धगधगत आहे.
मला असे वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्ताने मोठमोठे कार्यक्रम केले पाहिजे. परंतु कार्यक्रमधून त्यांची शिकवण, त्याचे विचार, उपदेश, मार्गदर्शन अगदी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच मनावर बिंबवले पाहिजे. त्यांच्या महान कार्याचे दर्शन झाले पाहिजे. येणाऱ्या पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. तरच बाबासाहेबांचे विचार जिवंत राहतील. नाहीतर आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना त्यांचा गाजावाजा करीत मिरवणूक काढणे, ढोल ताशा, डीजे वर बेधुंद होऊन नाच गाणे करणे, मोठ मोठे बॅनर्स, फ्लेक्स लावणे याच्यामध्येचं आपण अडकत चाललेलो आहोत. आणि खरं म्हणजे त्यांच्या विचारांना मूठ माती देण्याचाच प्रयत्न करत आहोत. आज बाबासाहेब जिवंत असले असते तर ह्या गोष्टी त्यांना कदापिही आवडली नसती.
समाजामध्ये मी जेव्हा हिंडतो, फिरतो, लोकांशी बोलतो तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे समाजातला काही घटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलित समाजापूरता मर्यादित ठेवतात. पण त्यांना हे माहित नाही दलित म्हणजे कोण? दलित समाज म्हणजे कोणता समाज? मग मी त्यांना सांगत असतो की बाबांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचेचं नव्हते तर ते संपूर्ण देशाचे, मानवजातीचे लोक कल्याणकारी राष्ट्रभक्त होते. पुढे मी त्यांना आणखी काही उदाहरण द्यायचे प्रयत्न करतो.
"मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही". बाबासाहेबांनी येवला नाशिक येथे 1935 साली केलेली घोषणा ! ही घोषणा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी समाज दोन गटात विभागला गेला होता. एक म्हणजे सवर्ण आणि दुसरा दलित. सवर्ण गट हा उच्च शिक्षीत होता तसेच त्याचा विकास झालेला होता. आणि दलित गट म्हणजे दीन दुबळे, कष्टकरी, मजूर, वंचीत तसेच समाजातील खालच्या स्तरातील लोक हे सर्वच दलित म्हणून ओळखले जात होते. दलित हा समाज नसून जे विकासापासून, शिक्षणापासून वंचित पिछडा वर्ग यांचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाची दुखती नस ओळखली आणि त्यांच्यासाठीच आपले जीवन त्याग करण्याची भूमिका घेतली. आंबेडकर पूर्वीची, आंबेडकरांची,आणि आंबेडकरनंतरची दलित चळवळ, या चळवळी मध्ये थोर महापुरुषांनी दलित चळवळीचा अभ्यास करून त्यांचा विकास करण्यासाठी न्याय, हक्क, समता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
फुले दांपत्य यांनी दलितांसाठी तसेच महिलांसाठी प्रथम शाळा सुरू करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले. त्यानंतर आंबेडकरांनी दलित चळवळ हाती घेतली. बाबासाहेबांनी सर्वप्रथम दलितांना जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला. काही महत्त्वपूर्ण घटना बाबासाहेबांच्या कार्यात भर घालतात. काळाराम मंदिर प्रवेश, महाडचे चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मतीदहन, माणगाव परिषद इत्यादी. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवला.
डॉ. बाबासाहेब एक निष्णात कायदे पंडित होते. कायदेमंडळात जेव्हा कायदे तयार करण्याची वेळ येत असे तेव्हा ते कोणत्याही समाजातील एका घटकासाठी विचार करत नसे. त्यांना दलित, अल्पसंख्याक, पिछडा वर्ग यांची जाण होती. म्हणून जेव्हा कायदेमंडळात कायदे पारित केले जायचे तेव्हा या वर्गाचा बाबासाहेब निश्चितच विचार करत असे. कामगार, स्त्रिया ,शेतकरी, मजूर सर्वच घटकांना विचारातून न्याय देण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न होता.
डॉ. बाबासाहेब महिलांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील होते. महिलांच्या हितासाठी त्यांनी "हिंदू कोड बिल" विधिमंडळात पारित करून घेतले. नोकरदार, कामगार महिलासाठी प्रसूति रजा मंजूर करून घेतली. जगात पहिल्यांदाच महिलांना प्रसूती विषयक रजा आपल्या देशात बाबासाहेबांनी मिळवून दिली. कालांतराने इतर देशात त्याचे अनुकरण केले गेले.
बाबासाहेबांचे राजकीय विचार अगदी स्पष्ट होते, त्यांनी त्यांच्या अनुयायांना एक मूलमंत्र दिला. तो म्हणजे 'मोक्याच्या जागा काबीज करा' जर स्वतःचा आणि समाजाचा विकास साधायचा असेल, तर देशाच्या उच्च पदावर विराजमान झाले पाहिजे अन्यथा आपल्याला जीवनभर गुलामच म्हणून जगावे लागेल, त्यासाठी बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष', 'शेडुल्ड कास्ट फाउंडेशन ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढवून कायदे मंडळात प्रवेश करता येईल आणि शोषित, वंचित, दलितांना विकासाच्या प्रवाहात आणता येईल असे त्याचे स्पष्ट मत होते.
या लेखाच्या माध्यमातून मी आपणास आव्हान करू इच्छितो की बाबासाहेब हे तुमचे आमचे नसून ते अखंड राष्ट्रासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी लढणारे, झगडणारे एक ज्वलंत धगधगणारे विचार आहेत. आणि त्यांचे विचाराचे अनुकरण करून आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं तर अशा थोर महापुरुषांना त्यांच्या जयंतीदिनी खरी आदरांजली ठरेल हे निश्चित आहे. अशा मानवतेच्या महामानवाला जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!!
बाळराजे पवार
पोलीस उप निरीक्षक,
वाकोला पोलीस ठाणे, मुंबई



